You are currently viewing पोलीस पाटलांच्या मागण्यांचा शासन स्तरावर योग्य निर्णय होण्यासाठी सकारात्मक अभिप्राय द्या…

पोलीस पाटलांच्या मागण्यांचा शासन स्तरावर योग्य निर्णय होण्यासाठी सकारात्मक अभिप्राय द्या…

सिंधुदुर्ग संघटनेची मागणी; जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर…

सिंधुदुर्गनगरी

पोलीस पाटलांच्या शासन स्तरावर विविध मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्यांवर योग्य निर्णय व्हावा. यासाठी आपल्याकडून शासनाला सकारात्मक अभिप्राय द्यावा. अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस पाटील संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

पोलीस पाटील हे पद शासन, प्रशासन व जनता यांच्यामधील अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. गावांमध्ये कायदा सुव्यवस्था राखने, जातीय सलोखा राखणे, नैसर्गिक आपत्तीमध्ये मदत कार्य करणे, शासना तर्फे राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक अभियानात सहभागी होऊन जनजागृती करणे, अवैध धंदयाना प्रतिबंध करणे ,सण उत्सव शांततेत पार पाडणे, आदी विविध कामे पोलीस पाटील जबाबदारीने पार पाडत आहेत. प्रशासनाच्या संपर्कात राहून प्रत्येक घडामोडीची माहिती वरिष्ठ पातळीवर देऊन प्रशासनाला सहकार्य केले जात आहे. असे असताना पोलीस पाटील याना आवश्यक शासकीय सोयी सुविधा मिळत नाहीत .अनेक वर्षापासून शासन दरबारी विविध मागण्या प्रलंबित आहेत. याबाबत पोलीस पाटील संघटनेमार्फत वेळोवेळी शासनाचे लक्ष वेधण्यात आले आहेत. येत्या २२ डिसेंबर रोजी होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात याबाबत शासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहेत.त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून संघटनेचे प्रमुख पदाधिकारी अधिवेशनाला जाणार आहेत. त्यासाठी प्रशासनाकडून आमच्या मागण्यांचा विचार करून शासनाला आपला सकारात्मक अभिप्राय द्यावा. अशी मागणी करणारे निवेदन आज सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस पाटील संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांना सादर करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष स्वप्निल वेंगुर्लेकर, सचिव राजेश जानकर, यांच्यासह पोलीस पाटील संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. शासनाला सादर करण्यात आलेल्या निवेदनातून पोलीस पाटलांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा