कणकवली
कणकवली बस स्थानकासमोर सर्व्हिस रस्त्यावरून येणारी बस आणि महामार्गावरून गोवा ते मुंबई जाणारा टेम्पो यांच्यात सकाळी दहाच्या सुमारास धडक झाली. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही मात्र एसटी आणि टेम्पोचे नुकसान झाले आहे.
कणकवली शहरातील उड्डाणपुलाखाली दोन सर्व्हिस रस्त्याच्या मध्ये अनेक दुकाने थाटण्यात आली आहे. यात महामार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांना सर्व्हिस रस्त्यावरून क्रॉस करणारी वाहने दिसत नाहीत. आज सकाळी दहाच्या सुमारास सेवा रस्त्यावरून बस स्थानकात एसटी जात होती. मात्र उड्डाणपुलाखाली असलेल्या स्टॉलमुळे टेम्पो चालकाला बस येत असल्याचे लक्षात आले नाही. त्यामुळे एसटीच्या एका बाजूला टेम्पोची धडक बसली. यात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू होते. दरम्यान कणकवली शहरातील उड्डाण पुलाखाली असलेल्या अतिक्रमणांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गतवर्षी याच ठिकाणी सर्विस रस्त्यावरून येणारी आणि महामार्गावरून जाणारी दुचाकी यांच्यात अपघात होऊन एका दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला होता. त्यामुळे आता तरी महामार्ग विभाग उड्डाणपुलाखालील अतिक्रमणे हटवणार का? असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे.