समग्र शिक्षा अभियान अंतर्गत भंडारी हायस्कूल येथे आयोजन
मालवण
समग्र शिक्षा अभियान अंतर्गत गटसाधन केंद्र पंचायत समिती मालवणच्या वतीने जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कूल येथे आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांग समता सप्ताहाचा शुभारंभ मालवणचे गटशिक्षणाधिकारी श्री. संजय माने यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी दिव्यांग सप्ताहनिमित्त मालवण शहरात जनजागृती फेरी काढण्यात आली.
शिक्षण विभागाच्या वतीने ३ डिसेंबर ते ९ डिसेंबर या कालावधीत दिव्यांग समता सप्ताह साजरा केला जाणार आहे. या सप्ताहाचे औचित्य साधून आज मालवण पंचायत समिती शिक्षण विभागाने जनजागृती फेरी काढून दिव्यांगाना शिक्षण प्रवाहात आणण्या विषयी जनतेत जागृती केली.
यावेळी काढण्यात आलेल्या जनजागृती फेरीत मालवणच्या भंडारी ए. सो. हायस्कूलच्या मुलांनी सहभाग दर्शवला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी दिव्यांगांना संधी….हीच प्रगतीची नांदी , दिव्यांगांचा मान …. हाच देशाचा अभिमान, दया नको संधी द्या…. दिव्यांगाना सामावून घ्या, शासनाचे एकच लक्षण,…. गरजेनुरूप विशेष शिक्षण, दिव्यांग व्यक्ती कोणाची… तुमची आमची सर्वांची, जरी बाळ असेल बधिर तरी… शिक्षणाला नको उशीर अशा घोषणा देत सारा आसमंत दणाणून सोडला.
यावेळी गटशिक्षणाधिकारी श्री संजय माने , सर्व शिक्षा विभागाचे विषय तज्ञ विकास रुपनर, स्वप्नील पाटणे, तसेच विषय शिक्षक नितीन पाटील, महेश चव्हाण, आणि प्रशाळेचे पर्यवेक्षक एच बी तिवले , आर डी बनसोडे , अरविंद जाधव , ए ए चव्हाण मॅडम आणि विध्यार्थी सहभागी झाले होते

