You are currently viewing “स्वच्छ जल से सुरक्षा” अभियानात ग्रामपंचायतीनी सहभाग घ्यावा – – प्रजित नायर

“स्वच्छ जल से सुरक्षा” अभियानात ग्रामपंचायतीनी सहभाग घ्यावा – – प्रजित नायर

“स्वच्छ जल से सुरक्षा” अभियानात ग्रामपंचायतीनी सहभाग घ्यावा –  प्रजित नायर

सिंधुदुर्गनगरी

 जलजीवन मिशनच्या माध्यमातून स्वच्छ व शाश्वत पिण्याचे पाणी नागरिकांना नियमित पुरवठा व्हावे, या उद्दात हेतूने दिनांक १ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत राज्यभरात “स्वच्छ जल से सुरक्षा” हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी केले आहे.

          दूषित पाण्यामूळे विविध जलजन्य आजार पसरु शकतात. पाण्याची गुणवत्ता राखणे ही सर्व ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे. राज्य पाणी व स्वच्छता मिशन कक्ष यांनी दिलेल्या सूचनानुसार दिनांक १ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत राज्यभरात “स्वच्छ जल से सुरक्षा” हे अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील सर्व पिण्याच्या पाण्याचे स्त्रोताची जैविक व रासायनिक तपासणी करण्यात येणार असून त्याचे रिपोर्ट ऑनलाईन वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात येणार आहेत. जिल्ह्यात असलेल्या ५ हजार ६५६ स्त्रोताचे जिओ टॅग करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून महसूल गावनिहाय पाच महिलांना प्रशिक्षीत करण्यात आले असून त्यांच्या माध्यमातून पिण्याच्या पाणी नमुन्याची जैविक व रासायनिक तपासणी करण्यात येणार आहे. याकरीता लागणारे जैविक पाणी तपासणी किट ग्रामपंचायत स्तरावर वितरीत करण्यात आले आहे.

          जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्यांच्या स्त्रोतांचे वर्षातून एक वेळा रासायनिक तपासणी प्रयोगशाळेच्या माध्यमातून करण्यात येते. या अभियान कालावधीत गावागावातील पाणी नमून्यांची रासायनिक तपासणी रासायनियक फिल्ड टेस्ट किटच्या माध्यमातून गावातच करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने निवड करण्यात आलेल्या महिलांच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता राखली जाणार आहे. यासाठी तालुकानिहाय प्रशिक्षण देण्याची कार्यवाही सुरु असुन या महिलांना रासायनिक पाणी नमूने तपासणी किटही देण्यात येणार आहे. या किटच्या माध्यमातून गावातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची फ्लोराईड, लोह, गडूळपणा (टर्बिडिटी), कॅल्शियम, मॅग्नेशियम, पीच, एकूण क्षारता (अल्कलीनिटी), एकूण कठिणपणा (हार्डनेस), क्लोराईड, नायट्रेट आदी घटकांची तपासाणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जनता हि आरोग्य व स्वच्छता विषयक जागृक असल्याने जलजन्य आजाराचे प्रमाण अंत्यत कमी आहे. ग्रामपंचायत निहाय प्रशिक्षित करण्यात येणाऱ्या महिलांनी आपल्या गावातील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोतांचे रासायनिक फिल्ड टेस्ट किटच्या माध्यमातून करुन घेवून दिनांक १ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत राज्यभरात “स्वच्छ जल से सुरक्षा” या अभियानांत सहभाग घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नायर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा