जागतिक एड्स दिनानिमित्त लेख
एड्सला करण्या हद्दपार, प्रतिबंध हाच आधार
एड्स सारख्या महाभयंकर रोगाबद्दल आणि त्याच्या संक्रमणाबद्दल लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी १ डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून साजरा केला जातो. जगभर पसरलेल्या एड्स या जीवघेण्या रोगाबद्दल जनजागृती व्हावी, आणि या रोगामुळे मरण पावलेल्यांचा शोक वक्त व्हावा, म्हणून हा दिवस पाळावा असे संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केले आहे. ऑगस्ट १९८७ मध्ये जेम्स डब्लु. बन् आणि थॉमस नेटर या दोघांनी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशच्या, जिनेवा येथिल जागतिक कार्यक्रमात ही संकल्पना मांडली. प्रथम १ डिसेंबर १९८८ पासुन हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून पाळण्यात येऊ लागला. अशा या महाभंयकर रोगाबद्दल जाणून घेवूया…. |
नाही लस नाही उपचार प्रतिबंध हाच खरा आधार या उक्तीप्रमाणे आजही जगामध्ये एचआयव्ही/एड्स यावर कुठल्याही प्रकारची लस उपलब्ध नाही. म्हणूनच जागतिक स्तरावरून एचआयव्ही नियंत्रणात्मक कार्यप्रणाली राबविण्यात येत आहे. भारतामध्ये राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेच्या माध्यमातून नियंत्रणाचे कार्य केले जाते. याअंतर्गत महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था यांच्या अंतर्गत प्रत्येक जिल्हानिहाय जिल्हा एड्स नियंत्रण युनिटच्या माध्यमातून कामकाज केले जाते.सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये एकात्मिक समुपदेशन व चाचणी केंद्र जिल्ह्यातील सर्व शासकीय दवाखान्यांमध्ये कार्यरत आहेत या केंद्रामधून स्वैच्छिक एचआयव्ही तपासणी व समुपदेशन मोफत करण्यात येते. संबंधित रुग्णांना एआरटी औषधप्रणाली पूर्णतः मोफत दिली जाते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यप्रणाली
आयसीटीसी एकात्मिक समुपदेशन व चाचणी केंद्र: या केंद्रामध्ये प्रशिक्षित समुपदेशक व प्रयोगशाळा तंत्रज्ञ कार्यरत आहेत. यामध्ये जोखमीच्या गटातील लोकांचे/संशयीत क्षयरोग, गुप्तरोगबाधित/ एचआयव्ही लक्षणांचे संशयीत व गरोदर स्त्रियांची मोफत एच.आय.व्ही. तपासणी व समुपदेशनः केले जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात, जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग, उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी व कणकवली, ग्रामिण रुग्णालय देवगड या रुग्णालयांमध्ये ही केंद्रे कार्यरत आहेत. यामधून एड्स बाबतच्या सेवा दिल्या जातात.
एआरटी केंद्र : एचआयव्हीबाधित रुग्णांना दिली जाणारी औषध प्रणाली म्हणजेच एआरटी. हे केंद्र आपल्या जिल्ह्यामध्ये जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे कार्यरत आहे. जिल्ह्यातील आयसीटीसीमधून एचआयव्हीबाधित निदान झालेल्या रुग्णांना या एआरटी केंद्राकडे संदर्भित केले जाते. येथे दरमहा मोफत औषध प्रणाली दिली जाते. या केंद्रात औषधप्रणाली, आहार, व्यायाम, निरोगी शरीर यावर समुपदेशन होते.
एसटीआय क्लिनिक: गुप्तरोगाविषयीचे निदान व समुपदेशन करणारे केंद्र जिल्हा – रुग्णालयात कार्यरत आहे. येथे एचआयव्हीबाधित रुग्णाची गुप्तरोग तपासणी होते. गुप्तरोग असणाऱ्यांना एचआयव्ही तपासणीसाठी आयसीटीसीकडे संदर्भित केले जाते. त्यांनाही मोफत औषधे दिली जातात.
रक्तपेढी युनिट: रक्तदात्याकडून रक्त स्विकारताना एचआयव्ही तपासणी करूनच स्वीकारले जाते. जिल्ह्यात तपासणी करूनच स्वीकारले जाते. जिल्ह्यात जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग व उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी या दोन्ही केंद्रामध्ये रक्तदात्यांची एचआयव्ही तपासणी सुविधा आहे.
जिल्हा एड्स नियंत्रण विभाग प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी मुंबई यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग जिल्हा चिकित्सक, जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनानुसार एच.आय.व्ही एड्स नियंत्रणात्मक कार्यप्रणाली राबविली जाते. जनजागृतीसाठी जिल्ह्यात २५ महाविद्यालयात आरआरसी स्थापन करण्यात आलेले आहेत. या माध्यमातून युवक-युवतींना प्रशिक्षण दिले जाते.
एड्स होण्याची मुख्य कारणे: HIV / AIDS रुग्णाचे रक्त दुसऱ्या रूग्णाला दिल्याने एड्स होऊ शकतो.दुषित रक्त असलेल्या सुई, इन्जेक्शन मधून देखील एड्स होऊ शकतो.HIV बाधित आईकडून स्तनपान करताना मुलाला होऊ शकतो.असुरक्षित लैंगिक संबंधामुळे देखील एड्स होऊ शकतो.
एड्सची लक्षणे :कित्येक आठवड्यापासून ताप येणे,कित्येक आठवडे खोकला असणे,विनाकारण वजन कमी होणे
तोंड येणे,भूक न लागणे, अन्नावरची वासना नाहीसी होणे,सतत जुलाब होणे,झोपताना घाम येत राहणे
एड्स आजाराविषयी गैरसमज : HIV / AIDS या असाध्य, अपरिचित असा रोग असल्याने चुकीचे गैरसमज बाळगणे हे सुद्धा समाजाच्या दुष्टीने घातक आहे.,HIV / AIDS हा रोग संसर्गजन्य रोग नाही आहे म्हणून रोगाच्या बाधित रूग्णाच्या सोबत राहणे, जेवणे, खेळणे, स्पर्श करणे, कपडे वापरणे, बाजूला झोपणे, शौचालयाचा वापर करणे या सगळ्या कारणामुळे या महाभयंकर रोगाची लागण होत नाही.,त्यामुळे हा रोग संसर्गजन्य रोग असल्याचा गैरसमज सर्व साधारण नागरिकांच्या मनात असतात. पण हा संसर्गजन्य रोग नाही.
सद्याच्या परिस्थितीमध्ये एड्स सारख्या रोगापासून वाचण्यासाठी व हा रोग होवू नये यासाठी दक्षता घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे. एड्सला रोखण्यासाठी आणि त्याला हद्दपार करण्यासाठी प्रतिबंध हाच आधार आहे.
शब्दांकन: रणजित पवार
उपसंपादक, जिल्हा माहिती कार्यालय, सिंधुदुर्ग