*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच…लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्य लेखक कवी सत्तू भांडेकर लिखीत अप्रतीम ललित लेख*
*सारुनी पदर धुक्याचा…*
उमलतेच ती कळी जणू..
हास्यप्रभा म्हणू की तुज मी नवी वाट म्हणू..
की जीवनाची वहिवाट म्हणू..
उजळतेच मनोमनी नव्याने ती पहाट जणू..
घट्ट दाटल्या अंधाराचा मागोवा घेत..ती उमललेली प्रभातकळी म्हणजे नव्यानं स्फुरलेली जीवनगाणीच..असंख्य तारकांनाही मिटवता न आलेलं अंधकाराच साम्राज्य..जिथं पूर्णगोल चंद्राचाही थांग लागत नाही एवढं…हो एवढ्या भयाण काळोखाला मिटवायचं म्हटलं तर उमलावंच लागते..अन् उजळावंच लागते तिला..राविकिरणांशी हात मिळवत..शुभ्र धवल धुक्यांनी आच्छादलेल्या पदराला हलकेच दूर सारत..तृणपर्णी सांडलेल्या दवबिंदूंना घट्ट मिठीत आवळतांना साधा तुडविल्याचा त्यांना भासही होऊ नये एवढं त्यांच्याशी एकरूप होत..धुसरशा काळोखावरती सुवर्ण रंगांची उधळण करत..येतेच ती सोनपिवळ्या किरणांना सोबत घेऊन सोनसळी पावलांना घट्ट रोवत..
ती उजाळली नाही तर..?
साधी कल्पनाही न केलेली बरी..पेरता येईल का नवी आशा..? शोधता येईल का नवी दिशा..? गवसेल का उम्मीड नवी..? मिटवता येईल का भयाण अंधकाराचे साम्राज्य..? पेरता येईल का प्रकाश नवा..? की न उमलताच कोंडल्या जातील कळ्याही..? की कोंडून कोंडून गुदमरतील आतल्याआत श्वासही..? सापडतील का वाटा ज्या हरवल्यात अंधकारात..? किती मोठी गुंतागुंत असेल ना जिची उकल कदापि शक्य नाही..
म्हणून येतेच ती अधरपाकळी हास्य फुलवत..मी पुन्हा येईल..मी पुन्हा येईल…म्हणत-म्हणत..नवी आशा नवी उमीद मनामनात रुजवत..सुस्तावलेल्या देहाला अलवार जागवत..कधी वाऱ्याचे गीत होऊन..तर कधी प्रकाशाचे कवडसे होऊन..उजाळतेच ती दवबिंदूची प्रीत पाहून..कणाकणावर पसरलेले अंधकाराचे साम्राज्य मिटवत..सृष्टीवर अंथरलेली धुक्यांची पांघरून तुडवत.. तर कधी गारठलेल्या देहासाठी उबेची शेकोटी पेटवत..उजाळतेच ती हास्यप्रभा स्वप्नांना मनात रुजवत…
आयुष्य अजून काय असेल याहून वेगळे..?
येतील जातील सुख दुःखाचे प्रसंग आगळेवेगळे…
जाता सकाळ येईल पुन्हा धुंद धुंद सांजवेळ
चालला असेल आयुष्याचा वळनोवळणी हाच खेळ…
सत्तू भांडेकर, गडचिरोली