You are currently viewing मराठ्यांचा स्वतंत्र लढा

मराठ्यांचा स्वतंत्र लढा

ब्रिगेडियर सुधीर सावंत यांचा लेख –

 

मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात अनोळखी राहिलेला भाग म्हणजे तामिळनाडूतील मराठ्यांचे राज्य. त्यांनी या राज्याचा कारभार सांभाळण्यासाठी नायकांचे राज्य १६७३ पर्यंत चालवले. १६७५ मध्ये विजापूरच्या सुलतानाने व्यंकोजी राजांच्या नेतृत्वाखाली मोठे सैन्य पाठवले आणि तंजावर वर कब्जा केला. व्यंकोजीनी स्वतंत्र राज्य स्थापन केले आणि स्वतःला राजा घोषित केले. तेथून तमिळनाडुमध्ये मराठ्यांच्या राज्याची सुरुवात झाली. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले काम सुरू केले, त्यावेळी आदिलशाही सरदार मुरार जगदेव यांनी छत्रपतींच्या पुण्यातील जहागिरीला उद्ध्वस्त केले होते. त्यातून महाराजांनी स्वराज्य उभारले, ते महाराष्ट्रापासून तामिळनाडू पर्यंत होते. बंगलोर पासून चेन्नई पर्यंत दक्षिण राज्य बनवले. तेव्हा व्यंकोजीनी तंजावरचे राज्य मजबूत केले. महाराजांना त्यांनी विरोध केला, तरी अंतिमतः मराठ्यांचे मजबूत राज्य दक्षिणेत बनले. जेव्हा राजाराम महाराजांना महाराष्ट्र सोडून दक्षिणेत यावे लागले. तेंव्हा जिजी किल्ल्यावर राजाराम महाराज व ताराराणी १६८९ ते १६९७ पर्यंत राहिले व मोघलांना महाराष्ट्र ते तमिळनाडू अशा विस्तीर्ण रणांगणावर युद्ध करावे लागले.

राजाराम महाराज आणि ताराराणीच्या काळात म्हणजे १६८९ पासून ते १७०७ पर्यंत मराठ्यांचा दूसरा स्वतंत्र लढा चालला. या काळात शिवरायांची आणि संभाजी महाराजांची गनिमी काव्याची युद्धनीती आणखी गतिमान झाली. किल्ल्यांमध्ये आणि चौक्यांमध्ये कमी लढाऊ शिबंदी ठेवून, घोडदळ सुसाट वेगाने तामिळनाडूपासून मध्यप्रदेश पर्यंत भ्रमण करत होते. ताराराणीच्या काळात तर मराठा सेनानीने नर्मदा पार करून मध्यप्रदेशमध्ये धुमाकूळ घातला. ओरिसा, आंध्रप्रदेश आणि पूर्ण दक्षिण महाराष्ट्रात आणि दक्षिण भारतात आपला प्रभाव पडला. त्यावेळी औरंगजेब एक एक किल्ला सर करायचा प्रयत्न करत होता. एक किल्ला घ्यायला जवळजवळ एक वर्ष त्याला लागत होते. किल्ल्यामध्ये मराठे कडवा प्रतिकार करायचे. मोघल सेनानी मध्ये भीतीयुक्त वातावरण होते. दिल्ली सोडून महाराष्ट्रात आपल्या कुटुंबासहित राहणारी मोघली सेना युद्धाला कंटाळली होती. मराठ्यांचे हल्ले त्यांच्या सैन्यावर सतत चालू होते. त्यांचा प्रतिकार करायला मोघली सेनेला जमत नव्हते. मराठे मरणाला अजिबात घाबरत नव्हते. उलट छत्रपती शिवरायांपासून एकेका मोहिमेवर जाण्यासाठी चढाओढ लागायची. छत्रपती गेल्यानंतर संभाजी महाराज १६८१ ला छत्रपती झाले. मराठा साम्राज्य जिवंत आणि शक्तिशाली होते. यावेळी त्यांच्याकडे जवळजवळ २४० किल्ले होते. सैन्य जवळजवळ ४० ते ५० हजार होते. ते ताराराणीच्या काळात २ लाखाच्या वरती गेले. आरमार जवळजवळ ५० ते ७० लढाऊ नौकांचे होते. त्यावेळी महसूल जवळजवळ १ कोटी रुपयांचा होता. राज्याचा विस्तार होऊन जवळ १ लाख चौरस किलोमीटर होता. आपल्या कारकीर्दत शिवरायांनी जवळजवळ ७००टक्के राज्य वाढवले होते.

मराठ्यांचे प्रशासन –

शिवरायांनी अती उत्तम मंत्रिमंडळ आणि प्रशासन व्यवस्था राबवली. संभाजी महाराज, राजाराम महाराज आणि ताराराणी पर्यंत प्रशासन व्यवस्था ही अगदी चोख राहिली होती. आणीबाणीच्या काळात सुद्धा ती कोलमडली नाही. संभाजी महाराज शिवाजी महाराजांसारखे न्याय निवाड्यात भाग घ्यायचे. भ्रष्टाचार, गुन्हेगारी विरुद्ध कडक निवाडे द्यायचे. त्याचप्रमाणे राजाराम महाराज आणि ताराराणी देखील दैनंदिन जीवनामध्ये न्याय निवाड्यात भाग घेत होते. सर्वांनी कृषिला फार महत्त्व दिले होते. संभाजी महाराजांच्या काळात त्यांनी अत्यंत नवीन उपक्रम शेतीसाठी निर्माण केले. नदीचे पात्र वळवून शेतीकडे नेण्याची उत्कृष्ट कल्पना संभाजी महाराजांचा काळात राबवली गेली.

स्वराज्याला शत्रू नेहमीच बलाढ्य होते, पण गनिमी काव्याच्या शास्त्रात छत्रपतीनी जो पाया रोवला तो अप्रतिम आहे. त्यांनी एकापेक्षा जास्त शत्रू कधी अंगावर घेतला नाही. सर्वांनी युद्ध टाळले. अगदी युद्ध अटळ झाले तरच युद्ध करण्यात आले. हे शक्ती संवर्धनासाठी फार गरजेचे होते. सर्वात चांगला मिलिटरी कमांडर तोच असतो, जो युद्ध केल्याविना जिंकतो. मराठ्यांचे युद्ध तंत्र हेच होते. छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक युद्धाचा पूर्ण अभ्यास करायचे आणि हल्ला करतेवेळी आपल्या सेनापतींना अति सूक्ष्म विषयावर सुद्धा पूर्ण माहिती द्यायचे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी जाहीर केले की दक्षिण भारतात दक्षिणेतील लोकांचेच राज्य राहिले पाहिजे. त्यांनी आदिलशाह आणि कुतुबशाह सोबत आपले संबंध चांगले केले. त्यात कुतुबशहाने त्यांचे वजीर मदन्ना आणि अक्कन्नामुळे छत्रपतींचे स्वागत केले. हे आदिलशाहने सुद्धा मान्य केले. पण आदिलशहाचा फार उपयोग नव्हता. पण कुतुबशहा शक्तीशाली होता. शिवाजी महाराज आपल्या सैन्यासह भागानगरीला गेले, तेव्हा कुतुबशहाने त्यांचे भव्य स्वागत केले. तेथून महाराजांनी दक्षिणेकडे कुज करून जिंजी आणि वेल्लोळचे किल्ले काबिज केले. १६७८ साली महाराजांनी एकोजीबरोबर लढा देऊन त्यांना पुर्णपणे हरवले. त्यामुळे त्यांनी दक्षिणेत बेंगलोर आणि चेन्नईच्या मध्ये स्वराज्याचा दूसरा भाग निर्माण केला. त्यांच्या दूरदृष्टीचे कौतुकच केले पाहिजे. कारण पुढे जाऊन औरंगजेबाने संभाजी महाराजांची क्रूर हत्या केली, त्यावेळी महाराष्ट्र पोरका झाला. पण जनतेमध्ये प्रचंड प्रक्षोभ निर्माण झाला. जनतेने उठाव केला. पण लोकांना वाटले नाही की, स्वराज्य टिकेल. येसुबाईंनी नेतृत्व केले व राजाराम महाराजांना छत्रपती करून दक्षिणेस पाठविले व स्वत: रायगडावर राहिल्या.

छत्रपती शिवाजी महाराजांनी बनविलेले दक्षिणेतील स्वराज्य आता उपयोगी पडले. राजाराम महाराज जिंजीला अत्यंत कठीण परिस्थितीत गेले. काही दिवसांनी ताराराणी सुद्धा जिंजीला गेल्या. इकडे महाराष्ट्रात मोघलांनी रायगड जिंकला व येसूबाई व शाहू महाराज औरंगजेबच्या कैदेत गेले. परत महाराष्ट्र हवालदिल झाला. पण मावळे खचून गेले नाहीत. संताजी, धनाजी सारख्या सेनापतींनी मोघलांच्या सैन्यात घुसून धुडघूस घातला. थेट औरंगजेबाच्या छावणीवर हल्ला करून त्याचा तंबू ताब्यात घेतला. पण औरगंजेब मुलीच्या तंबूत गेला होता, म्हणून वाचला. संताजीने औरंगजेबाच्या तंबूचे कळस कापून आणले. या पराक्रमाने महाराष्ट्रात पुन्हा चैतन्य निर्माण झाले. पुढे जाऊन संताजी-धनाजींनी मोघलांना हैराण करून सोडले. महाराष्ट्रापासून तमिळनाडू पर्यंत त्यांच्या सैन्याने जेरीस आणले. यात छत्रपती शिवरायांच्या युद्ध शास्त्राचे अचूक दर्शन होते की, आपण गेल्यानंतरही संभाजी महाराज, राजाराम महाराज आणि ताराराणी यांनी महाराष्ट्रापासून तमिळनाडू पर्यंत औरंगजेबच्या बलाढ्य सैन्याला नामोहरण करून सोडले. १७०० पासून १७०७ पर्यंत औरंगजेबाला ताराराणीच्या दहशतीखाली वावरावे लागले आणि शेवटी या महाराष्ट्रातच त्याला गाडले गेले. जो शेहनशहा अफगाणिस्तान पासून पूर्ण भारतावर राज्य करत होता, त्याचा पूर्ण पराभव शिवाजी महाराज आणि त्यांच्या वंशजानी केला. मोघली साम्राज्याचा पायाच ढासळला. छत्रपतींच्या युद्ध शास्त्राचा एवढा जबरदस्त परिणाम झाला की छत्रपती गेल्यानंतर सुद्धा मराठे २७ वर्ष औरंगजेबाशी लढले व त्या बादशहाने परत दिल्ली बघितली नाही. हाच तो मराठ्यांचा स्वतंत्र लढा.

लेखक : ब्रिगेडीयर सुधीर सावंत

वेबसाईट : www.sudhirsawant.com

मोबा. नं. ९९८७७१४९२९

प्रतिक्रिया व्यक्त करा