हवामान केंद्र उभारणीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी….
सिंधुदुर्गनगरी :
फळ पिक विमा योजनेचे निकष बदलण्यासाठी राज्यस्तरावर कृषि मंत्री यांच्या सोबत तातडीने बैठक घेऊ. तसेच जिल्ह्यामध्ये नविन निर्माण झालेल्या 18 महसुली मंडळामध्ये हवामान केंद्र उभारणीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी देवू असे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिले.
सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा मध्यवती बँकेच्या बैठक सभागृहात हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना सन 2020-21 करीता बदल करण्यात आलेल्या निकाषांबाबत आंबा उत्पादक शेतकऱ्यांसमवेत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा बॅकेचे अध्यक्ष सतीश सावंत, निवासी उपजिल्हाधिकारी सुभांगी साठे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस.एन. म्हेत्रे, संजय पडते, संदेश पारकर, आंबा उत्पादक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. उदय सामंत पुढे म्हणाले, फळ पिक विमा योजनेमध्ये करण्यात आलेले बदल हे राज्य शासनाचे नसून केंद्र शासनाने केलेले बदल आहेत. या विमा योजनेमध्ये असलेल्या अटींमध्ये बदल करण्यासाठी धोरणात्मक निर्णय होणे आवश्यक आहे. यासाठी राज्यस्तरावर कृषिमंत्री व जिल्ह्यातील फळ उत्पादक बागायतदार तसेच आंबा उत्पादक यांच्या प्रतिनिंधीशी मुंबई मंत्रालयात तातडीने बैठक आयोजित करण्यात येईल. या बैठकीत धोरणात्मक निर्णयाबाबत चर्चा होईल. असे सांगून पालकमंत्री पुढे म्हणाले, जिल्ह्यातील फळ उत्पादक विशेषत: आंबा उत्पादक यांना विमा योजनेचा लाभ मिळावा यासाठी हवामान केंद्राचा अहवाल महत्वाचा आहे. त्यासाठी जिल्ह्यात नवीन 18 हवामान केंद्र तातडीने उभे करण्यात येतील. ही हवामान केंद्र उभी करताना सर्वंकष बाबींचा विचार करण्यात येईल. तसेच यापुढील काळात हवामान केंद्र उभे करण्यासाठी जिल्ह्यातील आंबा उत्पादक व तज्ज्ञांची समिती गठीत करण्यात येईल. या समितीच्या अहवालानुसारच जिल्ह्यात हवामान केंद्र व त्यांचे स्थान या हवामान केंद्रांतर्गत येणा-या गावांची संख्या किलोमीटरच्या प्रमाणे निश्चित करण्यात येईल. यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करुन ही केंद्रे लवकरच कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नवीन 18 महसूल मंडळ निर्माण करण्यात आली आहे. या महसूल मंडळामध्ये हवामान केंद्र उभारण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांना पिक विमा योजनेचा लाभ मिळणे सुलभ होईल. असे सांगून पालकमंत्री उदय सामंत पुढे म्हणाले जिल्ह्यातील हवामान केंद्रे सदोष राहतील यासाठी कृषि विभागाने तातडीने कार्यवाही करावी. जी हवामान केंद्रे नादुरुस्त आहेत किंवा किरकोळ दुरुस्ती होणे आवश्यक आहे ती तातडीने करावीत. यासाठी नेमण्यात आलेल्या हैद्राबाद येथील एजन्सीला तातडीने कळवावे. तसेच या एजन्सीचा एक व्यक्ती कायमस्वरुपी या जिल्ह्यात राहील व हवामान केंद्राची देखभाल दुरुस्ती करेल याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष द्यावे. असे आदेश त्यांनी यावेळी दिले.