*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*
*दान….!*
दान या शब्दाशी प्रथम ओळख अशी झाली. दे दान सुटे गिराण…ग्रहण सुटल्यानंतर मातंग लोकांच्या या आरोळ्या ऐकताना मजा वाटायची. आजी त्यांना दरवाजात थांबवून धान्य ,तेल, कपडे असं काही बाही त्यांच्या झोळीत घालायची. देण्याचा हा संस्कार नकळत याच माध्यमातून झाला.
आम्ही लहानपणी कवड्या खेळायचो. त्या काळातला तो बोर्डगेम होता. दोन हातात कवड्या खुळखुळायच्या आणि डोळे मिटवून म्हणायचं “हवं ते दान पडू दे रे देवा!” खेळातल्या त्या दानाचा नक्की अर्थ काय होता ते कळलेच नाही तेव्हां.
आणखी एक. मैत्रिणींशी कधी कधी लुटुपुटीची भांडण व्हायची. तिनेच दिलेली एखादी वस्तू, तिने परत मागितली की पटकन् म्हणायचे “दिलं दान घेतलं दान पुढच्या जन्मी होशील श्वान!” तेव्हां दान हा शब्द असा वेगवेगळा अर्थ घेऊन जीवनात आला. तोपर्यंत दान, दानाचे महत्त्व, फायदे त्याचा पाप-पुण्याशी असलेला अध्यात्मिक संबंध याचा फारसा गंभीरपणे विचारही केला नव्हता.
हस्तस्य भूषणं दानम्
सत्यं कंठस्थ भूषणम्
श्रोत्रस्य भूषणं शास्त्रम्
भूषणै:ही किम प्रयोजनम्।।
संस्कृतच्या तासाला हा श्लोक पाठ करताना दान हे किती महत्त्वाचे आहे ते लक्षात यायला लागलं होतं. आपले हात हे देण्यासाठी आहेत, देणारे हात सुंदर असतात, छोटं-मोठं कुठलंही दान हे आपल्या हातांची शोभा वाढवतं.
त्यानंतर वाचलेली शिबिराजाची गोष्ट. ज्याने एका घायाळ पक्षाला वाचवण्यासाठी स्वतःचे मांस दान केले. कर्णाने आपली कवच कुंडले दान केली. हरिश्चंद्राने स्वप्नात दिसलेले प्रत्यक्ष उतरवून आपले संपूर्ण राज्य ऋषी विश्वामित्रांना दिले. दधिची ऋषींनी वृत्तासूराला मारण्यासाठी आपल्या अस्थींचे इंद्राला दान केले.
त्या जडणघडणीच्या वयात अशा अनेक दानशूर व्यक्तींच्या कथा वाचताना, दान हे स्वतःच्या जगण्याला किती अर्थ देणारे आहे हे जाणवायला लागलं होतं.
दान हा एक संस्कार आहे. ती एक वृत्ती आहे. दातृत्व हा गुण आहे. तो आर्थिक शक्तीवर अवलंबून नसून तो देण्याच्या मानसिकतेवर अवलंबून आहे.
पांडे नावाचे माझे एक सह कर्मचारी मित्र होते. सर्वसाधारण परिस्थितीतला, प्रामाणिकपणे दहा ते पाच नोकरी करणारा,सांसारिक जबाबदार्या असलेला गृहस्थ. पण कोणीही मदत मागायला गेला की, खिशात असतील नसतील तेवढे पैसे त्याच्या हातावर ते ठेवायचे.
त्यावेळी मी एकदा त्यांना म्हणालेही होते,” पांडेजी दान सत्पात्री करावं. लोक तुमचा फायदा घेतात. असे दातृत्व तुम्हाला कुठलेही पुण्य देणार नाही. ”
तेव्हा ते नुसतेच हसायचे.
त्यावेळी जाणवायचे ते— त्यांच्या मनात ना कुठली अपेक्षा, ना प्रसिद्धीचा हव्यास अथवा दिसायचा तो फक्त त्यांच्या देण्यातला निरहंकारीपणा. ते त्यांचं आत्मिक समाधान असायचं. त्यांच्या सुप्त मनाशी त्यांनी केलेला संवाद असायचा. तेव्हां कुठेतरी मनात यायचंही आपल्याला असं जमेल का?
‘त्याच वेळी पक्का कंजूष आहे तो’
‘किती पैसा आहे त्याच्यापाशी पण एक दमडी सुटणार नाही त्याच्या हातून कुणासाठी!’
‘काय डोक्यावर घेऊन जाणार आहे का निर्वाणीच्या वेळी?’ अशीही वाक्ये कानावर आढळली की दान, दातृत्व या शब्दाभोवतीचं सौंदर्य,पावित्र्य, महत्व आणि पांडे यांंची दानशूरता स्पर्शून जायची. मनावर एक धडा गिरवायची.
व्यक्तीच्या मनात असणारी लालसा, व्यक्तीला शांत बसू देत नाही. संपत्ती, वासना व्यक्तीस वाईट कृत्य करण्यास भाग पाडते. आणि हे करत असताना मनःशांतीचा लोप होऊ लागतो. यातून मुक्त होण्याचा, परम शांती मिळवण्याचा एकच मार्ग म्हणजे दान. द्या आणि देण्यातला आनंद अनुभवा. एकदा दिल्यानंतर त्यात अडकून राहू नका. गुंतून राहू नका. मुक्त व्हा.
पूजा करताना, प्रत्येक वेळी भोग चढवताना त्यावर पाणी सोडण्याचा विधी असतो. किंवा जेवणापूर्वीही अन्नाचा घास अग्नीला दान देण्याची आपली संस्कृती आहे. जे आपल्याजवळ आहे ते जरी आपली कमाई असली तरीही त्यावर संपूर्ण अधिकार आपला नसतो. एका भाकरीत अर्ध्या भाकरीचा वाटा इतरांचा असतो ,ही जाणीव म्हणजेच दातृत्व! शिवाय दिल्यानंतर त्यातून मुक्त होणे म्हणजेच खरं दान. सूप्त मनाशी केलेला हा व्यवहार म्हणजे दान. निखळ आत्मिक सौख्य.
दान हे काय फक्त धनांद्वारेच होतं असं नाही. अन्नदान रक्तदान, विद्यादान, देहदान,नेत्रदान, .अवयवदान, प्राणदान ही सारीच श्रेष्ठ दाने आहेत . आणि यथाशक्ती ती आपल्याकडून घडावीत हीच जीवनाकडून अपेक्षा. आपापली दानपेटी ओळखावी आणि त्यात यथाशक्ती दान
टाकावं.
मानवी जीवनाची नाळ ही मुळातच निसर्गाशी जोडलेली आहे. आणि दातृत्वाची शिकवणही निसर्गच देत असतो. एका बीजापोटी सहस्त्रपट दाण्यांचं दान धरती देते. फळांनी लगडलेला वृक्ष, सारी फळे इतरांची क्षुधा भागवण्यासाठी देऊन टाकतो. खळखळणारी नदी चराचराची तहान भागवते. आकाशातून बरसणारा मेघ धरतीला जीवनदान देऊन विरून जातो. फुलांचं आयुष्य किती अल्प! पण स्वतःच्या सुगंधाने जगताला चिदानंद देत,मिटून जातं. अवघ्या विश्वालाच या प्रेमाचं वरदान निसर्गाकडून मिळत असतं. दान देऊन रिक्त होणं ही शिकवण निसर्गच मानवाला देत असतो.
घसरणारा, दुष्कर्माने बरबटलेला समाजही टिकून राहतो तो अशा मूठभर दानशूर लोकांमुळेच.त्यांच्या दातृत्वानं. पडद्याआडच्या अनेक दानी लोकांमुळे अनाथाश्रम चालतात, आरोग्य केंद्र उभारली जातात,पीडित,परित्यक्त, निराधारांना जगण्याचं बळ मिळतं. ज्यांनी समाज स्वास्थ्यासाठी, राष्ट्रासाठी विश्वशांतीसाठी स्वतःचे जीवन खर्चिले,प्राणदानही केले त्यांच्यासाठी तर असेच म्हणावेसे वाटते ,
।हेचि दान देगा देवा
त्यांचा विसर न व्हावा…।।
राधिका भांडारकर. पुणे.