You are currently viewing मालवणात सर्व्हर डाऊनमुळे धान्य वितरणात अडचणी ; जिल्हा पुरवठा अधिकारी सुशेगात

मालवणात सर्व्हर डाऊनमुळे धान्य वितरणात अडचणी ; जिल्हा पुरवठा अधिकारी सुशेगात

धान्य दुकानदार ग्राहकांच्या रोषाला नाहक पडतायत बळी ; आता तहसीलदारांनीही वेधले जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे लक्ष

मालवण

मालवण तालुक्यात सर्व्हर डाऊनमुळे शासकीय रास्त धान्य दुकानात ग्राहकांना धान्य वितरणात अडचणी निर्माण होत आहेत. सर्व्हर डाऊन मुळे ग्राहकांना धान्यासाठी वारंवार रास्त धान्य दुकानांच्या फेऱ्या माराव्या लागत असून त्यामध्ये त्यांचा वेळ आणि पैशाचा अपव्यय होत आहे. याबाबत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून देखील या समस्येकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसून यामुळे रास्त धान्य दुकानदारांना नाहक ग्राहकांच्या रोषाला बळी पडावे लागत आहे. तरी यामध्ये सुधारणा घडवून आणण्याची मागणी रास्त धान्य दुकानदारांनी तहसीलदारांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, तहसीलदारांनी देखील जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे या प्रकरणी लक्ष वेधले असून आतातरी जिल्हा पुरवठा विभागाला जाग येणार का ? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

मालवण तालुक्यातील रास्त भाव धान्य दुकानदार यांना ई-पॉस मशिनला नवीन व्हर्जन ३.३ सॉफ्टवेअर अपडेट करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्याप्रमाणे सर्व धान्य दुकानदार यांनी ई-पॉस मशिनला नवीन व्हर्जन ३.३ सॉफ्टवेअर अपडेट केलेले आहे. परंतु ११ नोव्हेंबर पासून ई-पॉस मशिनला वारंवार एरर येत असून धान्य वितरण करण्यास विलंब होत आहे. सर्वच धान्य दुकानामध्ये लाभार्थ्यांची गर्दी होत असून ई-पॉस मशिनला एरर आल्याने धान्य वितरणात व्यत्यय येत आहे. मागील १४ दिवस सतत या समस्येला रास्त धान्य दुकानदार यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच ई-पॉस मशिनवरील ट्रान्सेक्शन प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सुरु आहे. ई-पॉस मशिनला Request Time out, Invalid Response from Server Transaction Failed, PDS Distribution stopped (009). Invalid me code under Meta tag (527), Server Connection Time- Out असे एरर येत आहेत. धान्य दुकानामध्ये मशीनला वेळोवेळी येत असलेल्या एररमुळे तसेच मशीन अत्यंत संथ गतीने चालत असल्याने धान्य दुकानदार व लाभार्थी यांचेमध्ये वेळोवेळी वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत. धान्य दुकानदार यांना लोकांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तरी ई-पॉस मशिनला वेळोवेळी येणारे एररर्स लवकरात लवकर दुर होवून ई-पॉस मशीनद्वारे धान्याचे वितरण सुरळीतपणे करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा