*अध्यक्ष, महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे तथा जागतिक साकव्य विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी माधव सातपुते (विगसा) लिखीत अप्रतिम लेख*
*निरोप*
********
निरोप हा शब्दच मुळात प्रत्येकाच्या जीवनाशी निगडित आहे. ती विलक्षण हृदयस्थ अशी मनसंवेदना असून परस्पर आत्मीयतेची द्योतक आहे. सहवासान मन मनांत गुंतुन जाते हे वास्तव आहे. जीवन हे देखील अतर्क्य आहे, जीवनाच्या प्रत्येक वळणावर अनुभूतिचे अनेक कंगोरे आहेत. तेथे भावनिक ओढ आहे , तेथे प्रत्येक नात्याची सुंदर जडणघडण आहे. आणि त्यातूनच प्रेम , वात्सल्य , मैत्रभाव अशी लाघवी नाती निर्माण होत असतात , जिव्हाळा निर्माण होत असतो .
पण जीवनात कर्मयोग हा प्रत्येकाच्या भाळी विधिलिखित आहे. आणि त्या कर्तव्यपूर्ती साठी जीवनात अनेक स्थित्यंतरे होत असतात. आपल्याला जिव्हाळ्याच्या नात्यापासुन दूर जावे लागते. हे वास्तव प्रत्येक जीवनात प्रत्ययास येते. यातून कुणीही सुटलेले नाही.
*परिस्थितीनुरूप एकमेकां पासुन दूर जावे लागते , म्हणजेच वियोग असतो हे सर्वश्रुत आहे.*
शिशु , शैशव , पौगंड , तारुण्य , ग्रहस्थ , प्रौढ़त्व , वृद्धत्व या साऱ्या जीवनाच्या निसर्गीके अवस्थेत , प्रत्येक वळणावर कुठल्या ना कुठल्या कारणाने म्हणजे अगदी कौटुंबिक असो सामाजिक असो अशा क्षेत्रात भावनिक *निरोप घेण्याची , निरोप देण्याची* वेळ प्रत्येकावर येत असते . आणि ही वेळ , हा निरोपाचा क्षण ,
*” निरोप* ” हा शब्द देखील अंत:करणाला दग्ध करणारा असतो. व्याकुळ करणारा असतो .
प्रत्येक नात्याला कधीतरी वियोगाला सामोरे जावे लागते. हे कटु सत्य आहे.
*मानवी मन हे पापभीरु आहे.* कधी कधी असे वियोगाचे , निरोप देण्याचे प्रसंग कधी येवूच नयेत असे प्रत्येकाला वाटते देखील. पण समोर येणाऱ्या परिस्थितिला आपल्याला धैर्याने सामोरे जावेच लागते. निरोप घेणे देणे या प्रसंगातील भावनिक विमनस्कतेची तीव्रता ही फार गंभीर आहे. प्रत्येक नात्यातील प्रासंगिक , परिस्थितीजन्य निरोप घेण्याची वेळ मग ती कुठलीही असो , ही अत्यंत हॄदयस्पर्शी , मनाला हेलावणारी आणि मनदग्ध करणारी असते. यातून प्रत्येकाला स्थितप्रज्ञतेने , विवेकाने सावरुन जगावे लागते हे मात्र खरे..!
कारण प्रत्येकालाच जगण्यासाठी अथक परिश्रम करावे लागतात. आणि त्यासाठी आपल्या सहृदांचे देखील आपल्याला मनावर दगड ठेवून साश्रुनयनांनी निरोप घ्यावे लागतात..!!
असे भावनिक निरोप घेण्याचे , निरोप देण्याचे प्रसंग म्हणजे….
*परस्परातील प्रेमभावनांची , मैत्रभावनांची , सहृदयी नात्यांची सुखावणारी , आपुलकीची जाणीव करून देणारी साक्ष असते.*
*शेवटी सारी नातीच ऋणानुबंधी असतात.. !!*
*कालाय तस्मै नमः।।*
*इती लेखन सीमा..*
*******************
*©️वि.ग.सातपुते. (पुणे )*
*अध्यक्ष : महाकवि कालिदास प्रतिष्ठान पुणे.( महाराष्ट्र )*
*📞 9766544908*