You are currently viewing सिंधुरत्न योजनेवर किरण सामंत, प्रमोद जठार यांची नियुक्ती

सिंधुरत्न योजनेवर किरण सामंत, प्रमोद जठार यांची नियुक्ती

निमंत्रित सदस्य म्हणून पाहणार कामकाज

सिंधुदुर्गनगरी

सिंधुरत्न समृद्धी योजनेच्या कार्यकारी समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातून उद्योजक किरण रवींद्र सामंत तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून माजी आमदार प्रमोद जठार याची शासनाने नियुक्ती केली आहे व यापूर्वीच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत याबाबतचा शासन निर्णय बुधवारी जाहीर करण्यात आला आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेले असताना रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी सिंधुरत्न समृद्धी योजना जाहीर केली होती व या योजनेच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष म्हणून शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची निवड करण्यात आली होती. तर ४ एप्रिल २०२२च्या शासन निर्णयाद्वारे शेखर निकम व प्रफुल्ल सुद्रीक यांची विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती त्यानंतर आता सरकार बदलल्यावर पूर्वीच्या निमंत्रित सदस्यांची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे .

सिंधुरत्न समृद्धी योजना कार्यकारी समितीचे अध्यक्ष तथा शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी बाळासाहेबाची शिवसेना मधून उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत व भाजपामधून माजी आमदार प्रमोद जठार याची सिंधुरत्न योजनेच्या कार्यकारी समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून शासनाकडे शिफारस केली होती, त्यानंतर आता शासनाच्या नियोजन विभागाने २३ नोव्हेंबरच्या शासन निर्णयाद्वारे पूर्वीच्या नियुक्त्या रद्द करून किरण सामंत व प्रमोद जठार याची नवे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. याबाबतचा शासन निर्णय जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाला आहे अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 + 7 =