आग्रे यांच्या रूपाने बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला तडफदार नेतृत्व लाभले
कणकवली
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुखपदी संजय आग्रे यांची निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या आदेशानुसार आग्रे यांची जिल्हाप्रमुख पदी निवड करण्यात आली. याबाबतची माहिती पक्षाचे नेते ब्रिगेडियर माजी खा सुधीर सावंत यांनी दिली.
मुंबई येथील सह्याद्री बंगल्यावर उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, रत्न सिंधू योजना सदस्य किरण सामंत, माजी खा. सुधीर सावंत यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. यावेळी माजी जि प सदस्य संदेश पटेल, नूतन तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, भास्कर राणे, सुनील पारकर, शेखर राणे आदी उपस्थित होते.
आग्रे यांच्याकडे कणकवली देवगड वैभववाडी कुडाळ मालवण या 5 तालुक्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. माजी जि प सदस्य असलेले संजय आग्रे हे प्रसिद्ध उद्योगपती असून राजकारणासोबत समाजकारण, शैक्षणिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असतात. सहकार क्षेत्रात त्यांचा मोठा बोलबाला आहे. अडीअडचणीला नेहमी हक्काने मदत मिळणारच ही संजय आग्रे यांची जनमाणसात ओळख आहे. शांत व संयमी स्वभावाचे आग्रे हे मितभाषी असले तरी जनतेची कामे करण्यात नेहमीच पुढे असतात. आग्रे यांच्या रूपाने बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला संघटन कौशल्य असलेले दमदार नेतृत्व लाभले आहे.
संजय आग्रे यांच्या या निवडीबद्दल सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी तहसील कार्यालयात त्यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.