*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी (स्ट्रेस रिलीफ एक्स्पर्ट) डॉ.चिदानंद फाळके यांचा अप्रतीम लेख*
*” आपण खरंच कोणासाठी जगतो ? “*
…… सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत प्रत्येक व्यक्ती राब राब राबते, काबाड कष्ट करते, दमून भागून घरी येते, घरातल्या सगळ्यांसाठी काहीतरी घेऊन येते, सगळ्यांचे लाड पुरवते आणि त्यांच्या चेहऱ्यावरील हसू बघून स्वतः समाधानी होते. ही व्यक्ती फक्त दुसऱ्यांसाठीच जगत आली आहे. स्वतःसाठी ही व्यक्ती जगली का ?
…… हा प्रश्न प्रत्येक वाचकाने स्वतःलाच विचारला पाहिजे. खरंच आपण कोणासाठी जगतो ?
…… बघा, प्रत्येक व्यक्ती नेहमी घरातील इतरांचा विचार करत असते. नवरा बायकोचा विचार करतो. बायको नवऱ्याचा विचार करते, दोघेही मुलांचा विचार करतात. सतत दुसऱ्यांचा विचार करत असतांना, तुमच्या विचारासारखे समोरच्या व्यक्तीकडून साध्य नाही झाले की तुम्हाला त्रास होतो. का करून घेता स्वतःला त्रास ?
…… विचार, विचार आणि विचार, हे विचारांचं काहूरच आपल्या मेंदूला अस्थिर बनवत असतं. विचार सकारात्मक असले तर ते आपल्याला कार्य करण्यास प्रवृत्त करतात, चालना देतात आणि यशस्वी होण्यास मदतही करतात. परंतु नकारात्मक विचार हे नेहमीच आपल्याला मानसिक, शारीरिक आणि भावनिक त्रास देत असतात.
मानसिक स्वास्थ्य बिघडविण्याचे कारण म्हणजे ह्या नकारात्मक विचारांचं चाललेलं युद्ध. “मन अस्थिर आणि शरीर स्थिर” असे सगळे उलट दुष्टचक्र सुरू झाल्याने समाजात अनेक व्यक्ती आळशी आणि निरुपद्रवी बनत चालल्या आहेत.
…… एखाद्या पांढऱ्या शुभ्र भल्या मोठया कोऱ्या कागदावर जर गुरुजींनी एका कोपऱ्यात शाईचा डाग पाडला आणि विचारले की, मुलांनो तुम्हाला काय दिसते, तर मुले पटकन सांगतात की, गुरुजी उजव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात “डाग” दिसतो. मग गुरुजी म्हणतात, मुलांनो हा भला मोठा कोरा पांढरा शुभ्र कागद तुम्हाला नाही दिसला, त्यातला कोपऱ्यातील बारीकसा काळा डाग मात्र दिसला…. करणार काय ? हीच तर मानसिकता आहे. मनुष्य पटकन नकारात्मकतेकडे आकर्षिला जातो. असे सांगितले जाते की दिवसभरात मनुष्याच्या डोक्यात साठ हजारांपेक्षा जास्त विचार येतात आणि जातात. त्यातील फक्त तीस टक्के विचार नकारात्मक असतात आणि ह्याच नकारात्मक विचारांमध्ये तो गुंतून जातो आणि स्वतःला त्रास करून घेतो. अहो, सत्तर टक्के सकारात्मक विचार येऊन जातात त्याकडे लक्ष गेलं का ?…. नाही ना?
…… नकारात्मक विचार सोडून द्या. स्वतःकडे लक्ष द्या. स्वतःविषयी सकारात्मक विचार करा. स्वतःमध्ये प्रगती करा. स्वतः जगायला शिका. सतत कोणाची तरी काळजी करू नका. “आपण आहोत म्हणून घर चाललं” हा विचार सोडून द्या. आपण असलो काय किंवा नसलो काय, काही फरक पडत नाही. आपण नसल्याने घरातील मंडळी जगणं सोडून देत नाही हे लक्षात घ्या. प्रत्येक जन्माला आलेल्या व्यक्तीच्या जगण्याची सोय त्या निसर्गाने करून ठेवलेली आहे, तुम्ही काळजी करू नका. पक्षांच्या प्राण्यांच्या पिलांना उडता चालता आले की ते स्वतः जगायला तयार होतात. आपल्या मुलांना काळजीच्या ओझ्याखाली ठेऊन अपंग करू नका. अशाने ते निष्क्रिय बनतात आणि पुढे जाऊन तुम्हालाच दोष देतात आणि प्रश्न करतात की, तुम्ही आमच्यासाठी काय केलं ?
…… एक गोष्ट लक्षात घ्या, उद्याचा दिवस कोणाचाच हक्काचा नसतो. “तुम्ही आज झोपलात आणि उद्या नाही उठला तर ? “. काळजी करणं सोडायला शिकविणारे हे वाक्य आहे. मंडळी, आजचा दिवस तुमचा आहे. आज जगून घ्या. स्वतःसाठी वेळ द्या. दररोज स्वतःसाठी क्वालिटी टाईम काढा. त्या वेळात तुम्ही आणि फक्त तुम्हीच असणार. तुम्हाला जे करायचं ते मनमोकळ्या पद्धतीने करा. गाणी म्हणा, कविता करा, लेख लिहा, चित्र काढा, रांगोळी डिझाइन्स तयार करा, नवीन पदार्थांच्या रेसिपी तयार करा, बागकाम करा, योग करा, प्राणायाम करा, धावायला जा, फिरायला जा, नृत्य करा, माती आणा मूर्ती करा, वाचन करा, वाद्य वाजवा, जे काही करायचे ते आनंद घेऊन करा. ज्या दिवसापासून तुम्ही स्वतःसाठी “मी टाईम” काढण्यास सुरुवात करणार त्या दिवसापासून तुम्हाला स्वतःमध्ये होत असलेला सकारात्मक बदल जाणवणार.
……. मंडळी, जगायला शिका – स्वतःसाठी जगायला शिका. जीवन खूप सुंदर आहे, त्याचा आनंद घ्यायला सुरुवात करा.
।। शुभं भवतु ।।
*डॉ. चिदानंद अप्पासाहेब फाळके*,
( स्ट्रेस रिलीफ एक्सपर्ट )
कर्णसखा : ९९२३३ ७६७५५
—————————————————-