सावंतवाडी :
नेहमी स्वार्थी राजकारण करणाऱ्या दीपक केसरकरांनी राणेंचा दहशतवाद संपवला नाही, तर त्यांनी आपल्या स्वार्थासाठी त्यांच्याशी मांडवली केली आणि आता दोघांनी सिंधुदुर्ग वाटून खायची तयारी सुरू केली आहे, असा घणाघाती आरोप शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी बुधवारी (दि.२३) सावंतवाडी येथे पत्रकार परिषदेत केला. दरम्यान केसरकर उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी सुद्धा इमान राखणार नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. कारण राजकारणात इमानदारीचा विरुद्धार्थी शब्द जो आहे ते म्हणजे दीपक केसरकर आहेत, अशी टीका त्यांनी यावेळी केली. महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेल्या उपनेते अंधारे यांनी सावंतवाडीत हॉटेल मँगो मध्ये पत्रकार परिषद घेतली. याप्रसंगी त्या बोलत होत्या.
सुषमा अंधारे म्हणाल्या, कणकवली येथील झालेली माझी जंगी सभा म्हणजे राणेंची उरली सूरलेली दहशतही संपण्यास मदत करेल. आमदार कुठेही गेले तरी शिवसेना तिथेच आहे, संपवायची म्हटली तर ती अधिक उफाळून येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. शिवसेना उपनेते अंधारे यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्यासह त्यांच्या दोन चिरंजीवांवर थेट शरसंधान साधले.
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या बाबत बोलताना त्या म्हणाल्या 40 आमदार कोणत्या कारणाने गेले हे सर्वांना आता समजले आहे. केसरकर त्यापैकी एक आहेत. केसरकर हे गोड बोलून केसाने गळा कापणारे आहेत. ते आता भाजपात जातील, इमान राखण्याचा विरुद्ध शब्द म्हणजे दीपक केसरकर, अशी खरबरीत टीका त्यांनी केली.
आजही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये मिंधे गटातील बरेच आमदार संपर्कात असल्याचे यावेळी अंधरो यांनी सांगितले. दरम्यान तलवार आणि शंख यांचे व्हिडिओ बाबत वक्तव्य करताना त्या म्हणाल्या, शंख बद्दलचा व्हिडिओ हा स्पर्धेतील असून दहीहंडीचा व्हिडिओ हा त्या काळातले सत्य आहे. त्यामुळे आरोप करणाऱ्यांनी होमवर्क करून करावा व्हिडिओ दाखवून सुषमा अंधारे यांना ट्रॅप करण्याचा प्रयत्न कोणी करू नये, असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी अंधारे म्हणाल्या, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणे यांच्यावरील आरोपांची जंत्रीच सभागृहात वाचून दाखवली होती त्याचे पुढे काय झाले असा सवाल त्यांनी केला. तर केसरकर मंत्री असताना सर्वाधिक कंत्राटे नितेश आणि निलेश राणेंना मिळाल्याचाही आरोप त्यांनी यावेळी बोलताना केला.
यावेळी शिवसेना उपनेत्या संजना घाडी, जिल्हाप्रमुख संजय पडते, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, जानवी सावंत, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार, तालुका महिला संघटक रश्मी माळवदे, शहर संघटक श्रुतीका दळवी, युवा सेना तालुकाधिकारी योगेश नाईक, मायकल डिसोजा चंद्रकांत उर्फ बाळा गावडे, शहर प्रमुख शैलेश गवंडळकर, राजू शेटकर, रमेश गावकर, राजा वाडकर, मेघश्याम काजरेकर, बाळू माळकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांचे सावंतवाडी शहरात आगमन होताच त्यांचे तालुकापमुख रुपेश राऊळ यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले त्यांनी शिवसेना तालुका मध्यवर्ती कार्यालयाला भेट दिली. त्यानंतर जवळच असलेल्या हॉटेल मँगो मध्ये पत्रकार परिषदेला संबोधन केले.