वाचकांनीच मागणी करावी ; जेष्ठ साहित्यिक महावीर जोंधळे यांचे आवाहन
मालवण
“पुस्तकांच्या कागदाच्या किमती बेफाट वाढलेल्या आहेत. कागदावर व साहित्यिकाच्या मानधनावर जीएसटी द्यावा लागतो तो रद्द होणे आवश्यक आहे. त्याशिवाय स्वस्त पुस्तके मिळणे कठीण आहे याकरिता वाचकांनीच मागणी करायला हवी” असे मत ख्यातनाम साहित्यिक व संपादक श्री महावीर जोंधळे यांनी येथे बोलताना व्यक्त केले.
मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण येथे मान्यवर साहित्यिकांबरोबर गप्पा टप्पा कार्यक्रम संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते . यावेळी व्यासपीठावर साहित्यिक इंदूमती जोंधळे, दीपा देशमुख, अरुणा सबाने आणि मनोविकास प्रकाशनचे अरविंद पाटकर, सेवांगणचे कार्यवाह श्री. लक्ष्मीकांत खोबरेकर, कोषाध्यक्ष बाबला पिंटो , मीना घुर्येंआदी मान्यवर उपस्थित होते
प्रारंभी श्री. लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी स्वागत केले. यावेळी महावीर जोंधळे यांनी आपणास शाळेत शिक्षकांनी प्रोत्साहन दिल्याने वाचनाची आवड निर्माण झाली. त्यानंतर घरात असणारे राष्ट्र सेवादलचे वातावरण त्याचप्रमाणे घरी येणारे सर्व व्यासंगी साहित्यिक यांचा प्रभाव आपल्यावर पडत गेला. यातूनच त्यांची वाचनाची आवड वाढून पुढे लिखाण करू लागले असे ते म्हणाले .
यावेळी मनोविकास प्रकाशनचे अरविंद पाटकर यांनी आजपर्यंत सुमारे बाराशे पुस्तकांचे प्रकाशन गेले. आज वाचक वर्ग कमी असला तरी तो चोखंदळ आहे. तिथंपर्यंत पुस्तक पोहोचणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी मान्यवरांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक प्रेरणादायी प्रसंगांचे ही वर्णन केले.
यावेळी उपस्थित साहित्यिकाची समयोचित मनोगते झाली शेवटी मनोजकुमार गिरकर यांनी आभार मानले.