You are currently viewing शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचे मालवणात जंगी स्वागत 

शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचे मालवणात जंगी स्वागत 

मालवण

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मुलुख मैदान तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मंगळवारी सायंकाळी येथील शिवसेना शाखेला भेट दिली. यावेळी महिला आघाडीच्या वतीने त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसेनेच्या प्रवक्त्या संजना घाडी या देखील उपस्थित होत्या. यावेळी श्रीमती अंधारे आणि घाडी यांनी उपस्थित महिला पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी महिला आघाडीच्या जिल्हा संघटक जान्हवी सावंत, तालुका संघटक श्वेता सावंत, दीपा शिंदे, सेजल परब, दर्शना कासवकर, रश्मी परुळेकर, तृप्ती मयेकर, पूनम चव्हाण, शिल्पा खोत, पूजा तलाशिलकर, विद्या फर्नांडिस, शुभांगी परुळेकर, निना मुंबरकर, निनाक्षी शिंदे, शांती तोंडवळकर, नंदा सारंग, प्रतिभा चव्हाण, साक्षी मयेकर, अंजना सामंत, दीपिका मोंडकर यांच्यासह शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, युवासेना शहरप्रमुख मंदार ओरसकर, उमेश मांजरेकर, पंकज सादये, भाई कासवकर, मनोज मोंडकर, बंड्या सरमळकर, सिद्धार्थ जाधव व इतर शिवसैनिक आणि महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. यावेळी श्रीम. अंधारे म्हणाल्या, जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उद्धारी असे म्हटले जात असले तरी महिलांनी केवळ पाळण्याची दोरी सांभाळू नये. फक्त मुलं जन्माला घालणे एवढंच महिलेचे काम नसून पाळण्याच्या दोरीबरोबरच अर्थसत्ता, धर्मसत्ता, राज्य सत्ता अशा सत्तेच्या सर्व दोऱ्या आपल्या हाती ठेवल्या पाहिजेत. शिवसेना महिला आघाडीत काम करणाऱ्या महिलांनी आपण कुठे कमी पडतोय हे शोधा, आणि त्यादृष्टीने काम करा. लोकांच्या छोट्या-मोठ्या प्रसंगात भेटून त्यांना साथ द्या, अडचणीच्या काळात लोकांना मदत करा, लोकांना आपली भूमिका पटवून देताना गोड भाषा वापरून लोकांशी संपर्क वाढवा, महिलांनी एकत्र येऊन काम करताना शिवसेना महिला आघाडी सक्षम करावी, असेही सुषमा अंधारे म्हणाल्या.

यावेळी मार्गदर्शन करताना उपनेत्या संजना घाडी म्हणाल्या, शिवसेनेच्या महिला आघाडीतील महिला कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन एकजूट ठेवली पाहिजे, बाळासाहेबांचे विचार सर्वत्र पोहचविले पाहिजे. शिवसेनेची महिला आघाडी ही मधमाशांसारखी असून ती एकत्र काम करून मध निर्माण करते तर कोणी दगड मारला तर अंगावरही जाते. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या दृष्टीने मतांच्या रूपाने विश्वास संपादन करा, आपल्या कामाच्या माध्यमातून शिवसेना मजबूत करा, असेही सौ. घाडी म्हणाल्या

प्रतिक्रिया व्यक्त करा