You are currently viewing सिंधू मित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

सिंधू मित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या ‘प्राणिक हिलिंग” या आगळ्यावेगळ्या आरोग्य विषयक शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिराचा लाभ सुमारे ५० नागरिकांनी घेतला व आयोजनाबाबत समाधान व्यक्त केले.


सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्यावतीने अनेक समाजपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. यात शैक्षणिक, जनजागरण व आरोग्य विषयक उपक्रमांचा प्रामुख्याने समावेश असतो. याच उद्देशाने फिलिपिन्समधील प्रसिद्ध उद्योगपती तसेच केमिकल इंजिनियर असणाऱ्या मास्टर चाओ कॉक सुई यांनी संशोधित केलेल्या “प्राणिक हिलिंग” या ऊर्जा चिकित्सा पद्धतीचा उपयोग करून रुग्णांकरिता निःशुल्क आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते.


या शिबिरात तात्कालिक उदभवलेल्या वेदना, केस गळती, संधिवात, मायग्रेन (अर्धशिर्शी), पाठदुखी ई शारीरिक आजार तसेच राग, भीती (फोबिया), ताण, आत्मविश्वास नसणे, व्यसन ई मानसिक समस्यांवर मार्गदर्शन व उपचार करण्यात आले. याशिवाय एकाग्रता, स्मृती, मनःशांती वाढविण्यासाठी तसेच अध्यात्मिक प्रगती कशी साधावी ? याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.
शिबिरात सहभागी नागरिकांना सर्वप्रथम “प्राणीक हिलींग” पद्धती विषयी माहिती मुंबई येथील प्रिया सबणीस आरते यांनी दिली. त्यांनी या उर्जापद्धती विषयी मार्गदर्शन करतांना सांगितले की, आपण आपल्या आरोग्यास तीन स्तरावर सुस्थितीत ठेऊ शकतो – शरीर, मन व आंतरिक – बाह्य ऊर्जा. यातील सर्व घटक एकमेकांवर अवलंबून असून याच्या सुस्थितीचा किंवा विकृतीचा परिणाम एकमेकांवर होतो.
या चिकित्सापद्धतीत रुग्णांना स्पर्श न करता व कुठलेही औषधोपचार न देता फक्त ऊर्जेच्या सहाय्याने व्याधीमुक्त केले जाते. यात शारीरिक चक्रांमधील दूषित ऊर्जा काढून प्राणशक्तीने पुनः उर्जित केल्या जाते. ही एक पूरक चिकित्सा पद्धती असून वैद्यकीय उपचार पद्धतीला सहाय्यक व पूरक असून रुग्ण लवकर व्याधीमुक्त होतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.
…यानंतर सर्व सहभागिनीं द्विहृदय ध्यान साधना केली व प्रत्यक्ष या पद्धतीचा अनुभव घेतला. यावेळी छबिलाल चंदेवार, श्रेयस दळवी, अँड्र्यू फर्नांडिस, शिवाई भांडे, डॉ मुग्धा ठाकरे, सिद्देश मणेरीकर, दिपक गावकर, भगवान रेडकर, अनघा शिरोडकर, प्रशांत कवठणकर, पौर्णिमा गौतम व डॉ प्रविणकुमार ठाकरे यांनी शिबिराच्या यशस्वीतेकरिता सहभाग नोंदविला.

प्रतिक्रिया व्यक्त करा