श्री पंचम खेमराज महाविद्यालयामध्ये युवराज लखमराजेंच्या हस्ते शुभारंभ
सावंतवाडी :
गावोगावी दुरस्थ शिक्षणाद्वारे शिक्षणाची ज्ञानगंगा पोहचविणाऱ्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्र साहेब रिसर्च सेंटर आता पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी यांच्याशी संलग्न होत आहे. आज शनिवार १९ नोव्हेंबर २०२२ रोजी श्री पंचम खेमराज महाविद्यालयामध्ये युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते हा उद्घाटन समारंभ पार पाडला. या समारंभाला महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. दिलीप भारमल, प्रा. एल.पी. पाटील, किशोर परब अभ्यासकेंद्राचे केंद्रसंयोजक अनिरुध्द जुवेकर, प्रा. गौरांग शेर्लेकर, प्रा.निलेश ठाकर, प्रा. पुप्षराज सावंत, एल.एम. सावंत यांसह प्राध्यापक, विद्यार्थीवर्ग उपस्थित होते.
अनेक वर्षापासुन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठांर्तगत साहेब रिसर्च सेंटर अभ्यासकेंद्राने गावपातळीवरील तसेच शिक्षणापासुन वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची कवाडे खुली करुन देत ज्ञानदानाचे कार्य केले. श्री पंचम खेमराज महाविद्यालयासारख्या नामांकित महाविद्यालयासोबत संलग्न झाल्याने दुरस्थ शिक्षणाच्या क्षेत्रात एक नविन उमेद निर्माण झाली आहे. आता येत्या काळात श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या सहकार्याने ज्ञानदानाचे कार्य उच्च स्तरावर तसेच नव्या उत्साहात होणार आहे. गावपातळीवरील विद्यार्थ्यांपर्यत पोहोचण्यासाठी नवे उपक्रम प्रत्यक्ष गावोगावी जाऊन घेण्यात येतील.
उद्घाटन समारंभामध्ये युवराज लखमराजे भोसले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना साहेब रिसर्च सेंटरच्या ज्ञानादानाच्या कार्याला पाठिंबा दर्शवला. आर्थिक परिस्थिती किंवा इतर कारणास्तव शिक्षणापासुन वचिंत असलेल्या विद्यार्थ्यांना दुरस्थ शिक्षणाद्वारे आपले शिक्षण पुर्ण करण्याचे त्यांनी आवाहन केले साहेब रिसर्च सेंटर सोबत दुरस्थ शिक्षणाद्वारे शिक्षणाची ज्ञानगंगा प्रत्येक गरजु विद्यार्थ्यापर्यंत पोहचवण्यात श्री पंचम खेमराज महाविद्यालय सदैव तत्पर राहिल अशी हमी देत पुण्यश्लोक बापुसाहेब महाराज, राणी पार्वती देवी यांचा वारसा जपणार असल्याच मत त्यांनी व्यक्त केल.