कणकवली
आचरेकर प्रतिष्ठानच्या सर्व उपक्रमांना कणकवली नगरपंचायतीकडून सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान व तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान मुंबई यांच्या सहकार्याने भारतीय शास्त्रीय संगीत परंपरेचा अभ्यास आणि रुची वाढविणारा त्रिसूत्री संगीत महोत्सव प्रतिष्ठानच्या नाट्यमंदिरात आयोजित केला आहे. या महोत्सांतर्गत आयोजित केलेल्या वामनदाजी शास्त्रीय गायन स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी श्री. नलावडे बोलत होते.
यावेळी पंडित सुधीर पोटे, पं.जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य पं. समीर दुबळे, आचरेकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष वामन पंडित उपस्थित होते. नगराध्यक्ष समीर नलावडे म्हणाले, आचरेकर प्रतिष्ठान व तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या वामनदाजी शास्त्रीय गायन स्पर्धेचा उपक्रम स्तुत्य आहे. आचरेकर प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी संगीत महोत्सव, नाथ पै एकांकिका, नाट्यमहोत्सवसह विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात. प्रतिष्ठानचे हे काम चांगले आहे. सांस्कृतिक क्षेत्रात काम करणे सोपे नाही, कारण या क्षेत्रात काम करणाऱ्यांना असंख्य अचडणी व समस्यांचा सामोरे जावे लागत असते. या परिस्थितीत या क्षेत्रात काम करणारी मंडळी धीरोदत्तपणे काम करते, ही बाब आपल्या सारख्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला अभिमानास्पद आहे. आचरेकर प्रतिष्ठानला नगरपंचायत कडून जी आर्थिक मदत केली जात होती, त्या वाढ करून ५० टक्क्यांपर्यंत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी देत शास्त्रीय गायन स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.पं. समीर दुबळे म्हणाले, शास्त्रीय गायन स्पर्धेत महाराष्ट्र व गोव्यातील स्पर्धक सहभागी झाले असून दोन्ही राज्यांमध्ये शास्त्रीय संगीताचा वारसा जिवंत असल्याचे हे चित्र आहे. संगीत ही अशी कला आहे ती शिकण्यापेक्षा आत्मसात करावी लागते. शास्त्रीय संगीताची गोडी असणाऱ्यांनी गायन स्पर्धांमध्ये सहभागी होऊन गोवा व महाराष्ट्राला लाभलेला शास्त्रीय संगीताचा वारसा पुढे न्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
वामन पंडित म्हणाले, सांस्कृतिक चळवळ पुढे नेण्यासाठी गेल्या चार दशकांपेक्षा जास्त काळ आचरेकर प्रतिष्ठान करीत आहेत. आचरेकर प्रतिष्ठानच्या कामाची जबाबदारी नव्या पिढीने स्वीकारली आहे. ही बाब कौतुकास्पद असून सांस्कृतिक चळवळीत नव्या पिढीने कनेक्ट व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलाने स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आचरेकर प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष ॲड.एन.आर.देसाई, लीना काळसेकर, उमेश वाळके, दामोदर खानलोकर, डॉ. समीर नवरे, मनोज मेस्त्री धनराज दळवी, सीमा कोरगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शरद सावंत यांनी केले.