You are currently viewing सावंतवाडी मतदारसंघातील ग्रामपंचायत निवडणुका नाम.केसरकरांसाठी प्रतिष्ठेच्या

सावंतवाडी मतदारसंघातील ग्रामपंचायत निवडणुका नाम.केसरकरांसाठी प्रतिष्ठेच्या

रामटेक वरुन ठरतेय रणनीती…

समर्थकांची बैठक

महाराष्ट्रात बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपा युतीचे सरकार सत्तेवर आले आणि गेली अडीज वर्षे सत्तेत असूनही शांत असलेले नाम.दीपक केसरकर मैदानात उतरले. शिंदेगटाकडून राज्याच्या प्रवक्तेपदी नियुक्ती केल्यापासून नाम.दीपक केसरकरांचा आक्रमक चेहरा सर्वांनी पाहिला आहे. आपल्या मतदारसंघात भविष्याच्या दृष्टीने बाळासाहेबांची शिवसेना तळागाळात पोचविण्याचे आव्हान असल्याने आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबरोबरच राष्ट्रवादीचे आव्हान समोर असल्याने नाम.दीपक केसरकर यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात होऊ घातलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका प्रतिष्ठेच्या केल्या आहेत.


“ग्रामपंचायत ही स्वायत्त संस्था आहे, तिथे राजकीय हस्तक्षेप नको म्हणून मी लक्ष घालत नाही”
असे यापूर्वी प्रत्येक वेळी सांगणारे नाम.दीपक केसरकर यांनी शिंदे गटात प्रवेश करून मंत्रीपदी विराजमान होताच मुंबईतील त्यांच्या रामटेक या निवासस्थानावरून लवकरच होऊ घातलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका या शिंदेगटाचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. सावंतवाडी मतदारसंघातील निवडणुका लागलेल्या गावागावातील समर्थक रामटेक या त्यांच्या शासकीय निवासस्थानी दाखल होत आहेत.


नाम.दीपक केसरकर ज्यांना उभे करतील त्यांना निवडून आणणार अशी परिस्थिती सावंतवाडी शहरात होती, परंतु गेली काही वर्षे राजकारणाने रंग बदलला आणि निवडणुका लढणे म्हणजे पैशांचा खेळ झाला आहे. अशा परिस्थितीत अनेक जण जे लोकांसाठी कार्यरत असतात ते मागे पडतात आणि “पैसा फेको तमाशा देखो” असा मदारीचा खेळ करणारे निवडून येतात. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुका सुद्धा त्याला अपवाद राहिल्या नाहीत. प्रत्येकजण आपल्या प्रतिष्ठेसाठी झटताना दिसत आहे. पूर्वी गाव पातळीवर होणाऱ्या निवडणुका आता त्या त्या भागातील नेत्यांनी प्रतिष्ठेच्या बनविल्या आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी मतदारसंघात दोडामार्ग २८, सावंतवाडी ५२, वेंगुर्ला २३ ग्रामपंचायती निवडणुकीसाठी सज्ज झाल्या आहेत तर जिल्ह्यात इतरत्र कुडाळ ५४, मालवण ५५, कणकवली ५८, देवगड ३८, वैभववाडी १७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. राज्यात, किंबहुना सिंधुदुर्ग जिल्ह्यात सत्ता समीकरणे बदलल्याने येत्या निवडणुकांमध्ये “सिकंदर कोण?” हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा