जिल्ह्याचे नैसर्गिक सौंदर्य व जैवविविधतेच्या संवर्धनासाठी विद्यार्थ्यांच्याही सहभागाची आवश्यकता
-जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी
सिंधुदुर्गनगरी
बाळ तुझ नाव काय, तुमची आवड काय? तुम्हांला काय माहिती पाहिजे ते विचारा, तुम्हाला काय व्हायचं आहे, तुम्हांला कोणत्या क्षेत्रात करीयर करायचे आहे. त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार, असे प्रश्न विचारत व विद्यार्थ्यांच्या मनातील इच्छा जाणून घेत जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी विद्यार्थ्यांशी मुक्तपणे संवाद साधला.
जिल्हाधिकारी कार्यालय व शासनाच्या इतर शासकीय कार्यालयांचे कामकाज कसे चालते याबाबत माहिती घेण्यासाठी युरेका सायन्स सेंटर, कणकवली व विद्या निकेतन कॉन्व्हेंट स्कुल कसाल मधील सुमारे 60 विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, प्रशिक्षणार्थी आय.ए.एस. करिष्मा नायर, प्र.निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांना विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारुन मनातील शंकांचे निरसन करुन घेतले तर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना तितकीच समर्पकपणे उत्तरे देण्यात आली. यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत,युरेका सायन्स सेंटरच्या संस्थापक सुषमा केणी, आम्ही कणकवलीकर मंडळाचे अशोक करंबेळकर, शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्हा निसर्गरम्य व जैवविविधतेत संपन्न असलेला जिल्हा आहे. जिल्ह्याचे नैसर्गिक सौंदर्य व जैवविविधतेच्या संवर्धनासाठी आपल्या सारख्या विद्यार्थ्यांही आवश्यकता आहे. येणाऱ्या भविष्यकाळात त्यासाठी आपण आपले योगदान द्यावे, असे आवाहन करुन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यावेळी म्हणाल्या, प्लास्टिकमुळे पर्यावरणास हानी पोहचत आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी शासनाने काही ठराविक मायक्रोनच्या वरील प्लास्टिकवर बंदी घातली आहे. पर्यावरण रक्षणासाठी विद्यार्थीदशेपासूनच प्लास्टिक टाळण्यावर भर दिला पाहिजे, आपल्या पालकांबरोबर इतरांनाही याबाबत जागरुक करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. प्रत्येक विद्यार्थ्यांनी पोलीस वॉच सारखे काम करण्याची आवश्यकता आहे.असे सांगून त्या पुढे म्हणाल्या, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम करण्याबरोबरच शासनाने जनतेसाठी घेतलेल्या कल्याणकारी योजनांची अंमलबजाणी करण्याचे कामकाज केले जाते. यासाठी शासनाच्या विविध विभागांमार्फत समन्वय साधून जनतेचा विकास करण्यावर भर दिला जातो. कोरोना, चक्री वादळे, अतिवृष्टी यासारख्या संकटामध्ये जनतेला दिलासा देण्याबरोबर या मधून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी, येणाऱ्या संकटावर मात करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा काम करते.
विद्यार्थ्यांनी आपले भविष्य घडविण्यासाठी आपल्या ध्येयाची निश्चिती केली पाहिजे, त्यासाठी अपार कष्ट करण्याची तयारी ठेवली पाहिजे, असे सांगून जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी म्हणाल्या, प्रत्येक विद्यार्थ्याने देशाचे चांगले नागरिक होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. विद्यार्थी दशेमध्ये विविध यंत्रणांचे कामकाज जाणून घेण्यासाठी आपणास संधी उपलब्ध झाली आहे त्याचा येणाऱ्या काळासाठी उपयोग होईल, यापुढच्या काळातही विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांची माहिती व्हावी, अनुभव यावेत, यासाठी फेसबुक लाईव्ह व कार्यशाळांचे आयोजन करण्याबाबत नियोजन करण्यात येईल, असे सांगून आय.ए.एस. होण्यासाठी त्यांनी स्वत:केलेले प्रयत्न व अनुभव यावेळी सांगितले आणि भावी आयुष्यासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
प्रशिक्षणार्थी आय.ए.एस. करिष्मा नायर संवाद साधताना म्हणाल्या, प्रत्येकांनी समाजाच्या कल्याणासाठी काम करावे, कोणतीही गोष्ट करताना ती मनापासून करावी, ध्येय निश्चिती करताना आपल्या मनामध्ये कष्ट करण्याची तयारी ठेवावी व त्यादृष्टीने प्रयत्न करावेत. यश आपणास हमखास मिळेल.
प्र.निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयकृष्ण फड संवाद साधताना म्हणाले, जग प्रचंड वेगाने बदलत आहे. त्यानुसार आपणामध्ये बदल घडले पाहिजेत. येणाऱ्या संकटांना तोंड देण्यासाठी सदैव सज्ज असले पाहिजे, समोर येणारी आवाहने पेलण्याची क्षमता स्वत:मध्ये निर्माण केले पाहिजे.
जिल्हाधिकारी कार्यालय व शासनाच्या इतर शासकीय कार्यालयांचे कामकाज कसे चालते याबाबत माहिती घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रत्येक विभागांना यावेळी भेटी दिल्या, विभागप्रमुखांकडून कामकाजाचे स्वरुप विद्यार्थ्यांनी जाणून घेतले.