शिक्षक न मिळाल्यास मुलांना पंचायत समितीत बसविणार-लक्ष्मी पेडणेकर
मालवण
केंद्रशाळा मसुरे क्रमांक 1 चे पदवीधर शिक्षक विनोद कदम यांच्या कामगिरीचा आदेश शिक्षण विभागाने काल रद्द केला. प्रत्यक्षात या प्रशालेची पटसंख्या ९३ असताना सद्यस्थितीत शिक्षकच नसल्याने गेले काही दिवस विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे आक्रमक बनलेल्या मसुरेतील ग्रामस्थ व शालेय व्यवस्थापनच्या पदाधिकाऱ्यांनी आज पंचायत समितीत धडक दिली. यावेळी झालेल्या चर्चेत सायंकाळपर्यंत दुसरा शिक्षक उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासन गटशिक्षणाधिकारी संजय माने यांनी दिले आहे.
दरम्यान प्रशालेस शिक्षक न मिळाल्यास सर्व मुलांना पंचायत समितीत आणून बसविणार असल्याचा इशारा शिक्षणतज्ज्ञ लक्ष्मी पेडणेकर यांनी दिला आहे.
पळसंब प्रशालेचे शिक्षक विनोद कदम यांना केंद्रशाळा मसुरे क्रमांक एक येथे कामगिरीवर काढण्यात आले होते. याप्रश्नी आक्रमक बनलेल्या पळसंब ग्रामस्थांनी काल पंचायत समितीत धडक देत याबाबत जाब विचारला होता. चर्चेअंती अखेर श्री. कदम यांचा कामगिरीचा आदेश शिक्षण विभागाने रद्द केला. आज मसुरेतील शालेय व्यवस्थापन समितीचे सन्मेष मसुरेकर, लक्ष्मी पेडणेकर यांनी पंचायत समितीत धडक देत गटविकास अधिकारी आप्पासाहेब गुजर यांच्याशी चर्चा केली. यावेळी सहायक गटविकास अधिकारी श्याम चव्हाण उपस्थित होते.
श्री. कदम यांची कामगिरी आदेश रद्द केला यावर आम्हाला कोणताही आक्षेप नाही. मात्र आमच्या प्रशालेची पटसंख्या ९३ असून हिंदी, इंग्रजी विषयाचा शिक्षकच नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे अन्य शिक्षक उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी गटशिक्षणाधिकारी संजय माने यांच्याशी फोनद्वारे झालेल्या चर्चेत त्यांनी श्री. खराबी या शिक्षकाची आज सायंकाळपर्यंत नियुक्ती केली जाईल असे आश्वासन दिले.
यावेळी प्रशालेस शिक्षक उपलब्ध करून न दिल्यास सर्व मुलांना पंचायत समितीच्या कार्यालयात आणून बसविणार असल्याचा इशारा सौ. पेडणेकर यांनी यावेळी दिला.