वाहन टॅक्सच्या कोट्यावधी रुपयांच्या रकमेला चुना….

वाहन टॅक्सच्या कोट्यावधी रुपयांच्या रकमेला चुना….

एजंट आरटीओ कार्यालय, ऑनलाईन सेवा पुरवणारी संस्था कर्मचाऱ्यांचा हात असल्याचा संशय.

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उपप्रादेशिक कार्यालयात 63 वाहनांची नोंदणी प्रक्रिया ऑनलाइन पूर्ण झाली त्यानुसार त्या वाहन मालकांना वाहनांचे पासिंग होऊन आरसी बुक ही प्राप्त झाले. मात्र या त्रेसष्ठ वाहनांचा टॅक्स भरला गेला नसल्याचे उघड झाले आहे. या टॅक्स ची रक्कम कोटीच्या घरात आहे.यामध्ये एजंट, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि ऑनलाईन सेवा पुरवणारे संबंधित संस्था यांच्या एका रॅकेट ने या जिल्ह्यात कोटींचा कर घोटाळा केला आहे.हे रॅकेट सर्व जिल्ह्यातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सहभागी असल्याचा पोलिसांचा अंदाज असून राज्यभरात हा घोटाळा झाल्याचा व सरकारला कोट्यवधी रुपयांचा चुना लावल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
गेल्या दोन वर्षांपासून वाहनांची नोंदणी ऑनलाईन प्रणालीवर होत आहे.वाहन खरेदी झाल्यानंतर त्या वाहनाची नोंदणी प्रक्रिया व कराची रक्कम ऑनलाईन पूर्ण होऊन वाहनांचे पासिंग होते व त्या वाहनाचा नंबर पडून ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्या वाहनाचे स्मार्ट कार्ड असलेले आरसी बुक वाहन मालकांना आरटीओ ऑफिस कडील अधिकृत केलेल्या संबंधित कंपनीमार्फत पोच होते. ही ऑनलाइन प्रक्रिया संगणक प्रणाली वर पूर्ण होताना पाच टप्प्यावर केले जाते. पहिला टप्पा आरटीओ कार्यालयातील लिपिक लॉगइन मधून सुरू होतो, त्यानंतर पर्यवेक्षक त्यानंतर पैसे भरणा त्यानंतर व्हेरिफिकेशन वाहन नंबर देण्याची प्रक्रिया व शेवटच्या पाचव्या टप्प्यावर उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी ऑनलाईन वर दिलेली मंजुरी अशी वाहन नोंदीची व पैसे भरून घेऊन वाहन नंबर देण्याचे व त्यानंतर ठरलेल्या अधिकृत कंपनीमार्फत वाहन मालकांना पोस्टाने आरसी बुक पाठविण्याची प्रक्रिया होत असते. मात्र या प्रक्रियेमध्ये या रॅकेट ने घोटाळा केल्याचे आता उघड होऊ लागले आहे. पैसे जमा करून घेण्याच्या लॉगीन मध्ये न जाताच तिसरा टप्पा वगळून चौथा आणि पाचवा टप्पा पूर्ण केल्याचे पोलीस तपासात उघड होत आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील 63 वाहनांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली मात्र तिसऱ्या टप्प्यावर वाहनांचा टॅक्स भरून घेण्याची प्रक्रिया वगळून शेवटच्या टप्प्यापर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यामुळे या वाहन मालकांच्या ताब्यात वाहनाचे आरसी बुक व वाहनाचे नंबर व पासिंग चे कागदपत्र असले तरीही या 63 वाहनांचा टॅक्स ऑनलाईन प्रणालीवर अनपेड दाखवत आहे.खरे तर हे टॅक्स चे पैसे वाहन मालकांनी एजंट करवी आरटीओ कार्यालयात जमा ही केल्याचे सांगण्यात येते व सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच वाहनाचा नंबर देऊन आरसी बुक ही आरटीओ कार्यालयाने अदा करत नोंदीची प्रक्रिया पूर्ण केल्याचे आता उघड झाले आहे.मात्र या शासनाला लुबाडणाऱ्या घोटाळ्याच्या रॅकेटमध्ये कोणाकोणाचा समावेश आहे याचे मोठे आव्हान सिंधुदुर्ग पोलिसांसमोर आहे.
या कर घोटाळ्याचा या जिल्ह्यातील आकडा कोटींच्या घरात जात असून या रॅकेटने राज्यभरातील जिल्ह्यांमध्ये असाच घोटाळा केल्याचा सिंधुदुर्ग पोलिसांचा अंदाज आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोटींच्या घरात हा घोटाळा असेल तर अन्य जिल्ह्यांमध्ये किती मोठ्या प्रमाणात आरटीओ कार्यालयाने संगनमताने घोटाळे करून शासनाची कोट्यवधी रुपयांची लुबाडणूक केल्याचा अंदाज आता व्यक्त होत आहे.त्यामुळे हा राज्यस्तरीय घोटाळा उघडकीस आणण्यासाठी पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.
आपल्या वाहनाची स्थिती जाणून घेण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाचे mparivahan हे ॲप मोबाईल वर डाउनलोड करून वाहनांची स्थिती वाहन मालकांना जाणून घेता येईल.जिल्ह्यातील 63 वाहनांच्या टॅक्स भरला गेला नसल्याचेही या ॲपवर तसेच परीवहन विभागाच्या वेबसाइटवर दिसत आहे. हे पैसे शासनाकडे जमा न होता या प्रणालीवरील रॅकेट ने हडप केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. यामध्ये मोठ्या रकमेचा कार वाहनांचा समावेश असून पैसे न भरले गेलेल्या वाहनांची यादी उपप्रादेशिक कार्यालयाने तयार केली आहे.या यादी चा अभ्यास करून पोलीस रॅकेट पर्यंत पोहोचण्याचा आणि या घोटाळ्याचा छडा लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. जिल्हा पोलिस प्रमुख राजेंद्र दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे तपास काम सुरू झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा