You are currently viewing १४ डिसेंबरला कणकवली तालुका खरेदी विक्री संघ मर्यादित कणकवलीची निवडणूक 

१४ डिसेंबरला कणकवली तालुका खरेदी विक्री संघ मर्यादित कणकवलीची निवडणूक 

कणकवली :

 

कणकवली तालुका खरेदी विक्री संघ मर्यादित कणकवलीची निवडणूक १४ डिसेंबरला होत आहे. यावेळी भाजपा पुरस्कृत सत्ता आहे, मागील निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यामुळे बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम राहणार काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत भाजपा, बाळासाहेबांची शिवसेना युती विरुद्ध शिवसेना उद्धव ठाकरे, महाविकास आघाडी लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले विठ्ठल देसाई यांनी गेली सात वर्षे संघाचा कारभार सांभाळला आहे. त्यामुळे पुन्हा भाजप पुरस्कृत पॅनल या निवडणुकीत आपले वर्चस्व राखण्याचे प्रयत्न करणार आहे.

तर पक्षाकडून आदेश आल्यास आपण या निवडणुकीत उतरणार असल्याचे शिवसेनेने ते सतीश सावंत यांनी सांगितले. पण शेतकरी संघाच्या हितासाठी ही निवडणूक बिनविरोध झाल्यास शेतकऱ्यांचे हित होईल असे देखील सावंत यांनी सांगितले. या निवडणुकीसाठी ११ नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आता जाहीर झालेल्या निवडणुकीनुसार ११ ते १७ नोव्हेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. उमेदवारी अर्जांची छाननी १८ नोव्हेंबर रोजी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २१ नोव्हेंबर आहे. तर निशाणी वाटप व उमेदवारांची यादी ६ डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून आवश्यकता असल्यास १४ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ यावेळेत मतदान होणार आहे.

तालुका खरेदी विक्री संघाची ही निवडणूक एकूण १५ जागांसाठी होत आहे. यात प्राथमिक शेती संस्था मतदारसंघातून सात सभासद निवडून द्यावयाचे आहेत. त्यासाठी ३७ संस्था मतदार आहेत. इतर संस्थांच्या माध्यमातून एका सभासदाची निवड करावयाची असून त्यासाठी १९ संस्था आहेत. तर व्यक्ती मतदारसंघातून दोन सभासद निवडायचे आहेत. अनु. जाती, जमातीमधून एक, महिला दोन, इतर मागास प्रवर्ग एक व विमुक्त जाती, भटक्या जमाती एक अशा सात सभासदांच्या निवडीसाठी ८२१ मतदार मतदान करणार आहेत. १५ जागांसाठी १४ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा