You are currently viewing जीवन रहाट

जीवन रहाट

*लेखिका कवयित्री मानसी जामसंडेकर, गोवा लिखित अप्रतिम मुक्तछंद काव्यरचना*

*जीवन रहाट*

क्षितिज….. धरती आकाश मीलन रेख
उसळतोय दर्या किनारा…..
शुभ्र धवल लाटांचा मारा…..
फेसाळलेल्या लाटा धडकतात किनारी
शंख शिंपले… वाळू कण परतताना
ठेवून जातात मागे,… नि, समुद्रात
होतात विलीन…….!
विखुरलेले वाळूकण, शंखांचे तुकडे जणु
विस्कळीत आठवणी आयुष्याच्या…..
रेंगाळलेल्या अशाच अंतरीच्या गाभ्यातल्या….
येतात निःशब्द अधरावरी……
एकाच छताखाली बालपणी बागडणारे जीव….
तरुणपणी जातात दूरदेशी….
नाही कोणाचा थांग ना पत्ता…..!
ह्या मतलबी व्यवहारी जगात
नियतीच्या साप शिडीचे होतात ते फासे पदोपदी……
कधी जोषाने यशाच्या शिखरी
नाहीतर येतात पायथ्याशी
नशिबाच्या सापाने गिळंकृत केल्यावरी…..
क्षितिज दूरवरून असतं खुणवत… खिदळत….
जीव मात्र दिनकरासवे असतो
दिवसारंभात…. मजेत झिम्माडत….
स्वर्णीम आभाच्या सुवर्ण सड्यात नहात….
मध्यांहीच्या तळपत्या प्रखरतेत….
मग सांजवेळी शीतल वाऱ्यासवे
केशरी पीत रंगांच्या गडदपणात जात मिसळून…..,
नीशेसह चंद्रमाच्या चांदण्यात तारकांशी फेर धरत….. खेळत
मध्येच धरेवर नजर ठेवून….
रातराणीच्या धुंद सुगंधात जात मिसळून……
रातच्या रतीसम…. कुशीवर कुशी बदलत
जात निद्रादेवीच्या आहारी
सुषुप्ती, जागृतावस्था अनुभवत
परत पुन्हा प्रभात प्रहरी
दिनक्रमारंभास सज्ज तत्पर
तेच ते जीवन रहाट चालू ठेवण्यास…..!
पानगळीतून उगवलेल्या…..
कोवळ्या नाजुकशा पल्लवीसम
शुष्क खोडातून डोकावणाऱ्या…..
लुसलुशीत हिरव्या पोपटी पर्णासम
नव चैतन्य, नवी उमेद घेऊन जीव
असतो तयार नव जीवन जगण्यास…..!!

मानसी जामसंडेकर
गोवा

प्रतिक्रिया व्यक्त करा