शिवसेना स्टाईल पालिका अधिकार्यांना दाखवून देणार…
सावंतवाडी
शहरातील अंतर्गत रस्ते खड्डेमय झाले आहेत. वारंवार पालिकेकडे मागणी करून सुध्दा कोणतीही कार्यवाही होत नाही. त्या रस्त्यातील खड्डे तात्काळ बुजवा अन्यथा बुधवारी १६ तारखेला पालिका कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करू, असा इशारा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी शब्बीर मणियार यांनी दिला आहे. या प्रश्नाबरोबर डासांचा प्रश्न, भटके कुत्रे, जनावरे, उघडी व अस्वच्छ गटारे आदी प्रश्नांबाबत आम्ही यापुर्वी पालिकेचा लक्ष वेधले. परंतु त्याकडे कोणी लक्ष देत नाही. त्यामुळे अटक झाली तरी चालेल शिवसेना स्टाईल अधिकार्यांना उत्तर देवू, असेही मणियार यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी ब्रेकिंग मालवणीशी संपर्क साधून ही माहिती दिली.
ते म्हणाले, गेले दिड ते दोन महिने आपण शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजवा अशी मागणी पालिकेकडे केली. परंतु वारंवार आश्वासने देवून आपल्याला उत्तरेच दिली आहे. परंतू प्रत्यक्षात कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहेत. अनेकांना अपघातात जायबंदी व्हावे लागत आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेता १६ तारखेला आम्ही आक्रमक होण्याचा निर्णय घेतला असून येथील कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे. ते पुढे लोकांच्या प्रश्नांसाठी आपण यापुर्वी तब्बल दिड महिने जेल भोगले आहेत. त्यामुळे उद्याच्या आंदोलनात आक्रमक भूमिका घेतल्यास आणि त्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडल्यास आम्ही जबाबदार राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.