*तपस्वी, कर्मयोगी लोकनेते म्हणजे प्रा. मधु दंडवते – प्रा.अरुण मर्गज*
कुडाळ :
“कोकण रेल्वेच्या माध्यमातून कोकणाला वेगाने विकासाकडे नेणारे तपस्वी कर्मयोगी लोकनेते म्हणजे प्रा मधु दंडवते.बॅ.नाथ पै यांचे कोकण रेल्वेचे स्वप्न उराशी जपून ते प्रत्यक्षात आणण्यासाठी आयुष्य वेचणारे, कोकण रेल्वेच्या माध्यमातून कोकणी जनतेच्या सुख समृद्धीचा ज्यानी पाया घातला ते लोकनेते म्हणजे मधु दंडवते होय.”असे उद्गार प्रा अरुण मर्गज यांनी काढले ते प्रा मधु दंडवते यांच्या पुण्यतिथीनिमित्त कुडाळ रेल्वे स्टेशनच्या आवारात उभारलेल्या मधु दंडवते यांच्या प्रतिमेचे पूजन व त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना ते बोलत होते. त्यांनी आपल्या पुढील मनोगतामध्ये ‘राजापूर मतदारसंघातून सलग पाच वेळा खासदार म्हणून निवडून आलेले व त्यांचे सहकारी जॉर्ज फर्नांडिस व अभियंता श्रीधरन आणि यांच्या मदतीने अशक्यप्राय वाटणाऱ्या कोकण रेल्वेला मूर्त स्वरूप देण्याचे अद्वितीय काम केलं. त्याबद्दल गौरवोद्गागार काढत त्यांच्या साधी राहणी उच्च विचार सरणी असलेल्या व्यक्तिमत्त्वाचा उपस्थितांना परिचय करून दिला. यावेळी प्रा मधु दंडवते यांच्या प्रतिमेसमोर कुडाळ रेल्वे स्टेशनच्या स्टेशन मास्तर प्रज्ञा नाईक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी रेल्वे कर्मचारी श्री.भाऊ नाईक, बॅरिस्टर नाथ पै नर्सिंग महाविद्यालयाच्या प्रा. सुमन करंगळे-सावंत, शांभवी आजगावकर, माईनकर, पूजा म्हालटकर व विविध अभ्यासक्रमांचे विद्यार्थी, रेल्वे प्रवासी उपस्थित होते.
बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन तथा कोकण रेल्वे एम्प्लॉइज युनियनचे अध्यक्ष उमेश गाळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ रेल्वे स्टेशन, सावंतवाडी रेल्वे स्टेशन, कणकवली रेल्वे स्टेशनच्या आवारात असलेल्या मधु दंडवतेच्या प्रतिमेचे त्यांच्या जन्म जयंती निमित्त व पुण्यतिथीनिमित्त पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण करण्यात येते.
याही वर्षी सावंतवाडीच्या रेल्वे स्टेशनच्या आवारात बी.एडचे प्राचार्य परेश धावडे, सावंतवाडी रेल्वे स्टेशन मास्तर प्रतीक आगवणे, वरिष्ठ स्टेशन मास्तर रवी शेट्टी, यांच्या हस्ते प्रतिमापूजन व करून आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सेंट्रल रेल्वेचे मेकॅनिकल शरद सावंत, दिनकर नाईक, प्रसाद कांनडे ,नेहा महाले, प्रणाली मयेकर इत्यादी उपस्थित होते. तसेच कणकवली स्टेशनच्या आवारात मधु दंडवते यांच्या प्रतिमेला उमेश गाळवणकर यांच्या हस्ते कणकवली तेथील दंडवते प्रेमींच्या उपस्थितीमध्ये पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली.