You are currently viewing पाटो पुल ते मच्छीमार्केट रस्त्याच्या डागडुजीेसाठी १४ लाख ६२ हजाराचा निधी

पाटो पुल ते मच्छीमार्केट रस्त्याच्या डागडुजीेसाठी १४ लाख ६२ हजाराचा निधी

खाजगी कंपनीकडून नुकसान भरपाई म्हणून ग्रामविस्तार अधिकारी डॉ मार्ये यांच्याकडे रक्कम सुपूर्द

बांदा

स्थानिक प्रशासनाची परवानगी न घेता शहरातील पाटो पूल ते मच्छिमार्केट रस्त्यावर खासगी मोबाईल कंपनीने केबल टाकण्यासाठी केलेली रस्त्याची खोदाई बांदा ग्रामपंचायत प्रशासनाने रोखत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. स्थानिक प्रशासनाच्या कारवाईच्या बडग्यामुळे मोबाईल कंपनीने नमते घेत रस्त्याची डागडुजी करण्यासाठी १४ लाख ६२ हजार ५०० रुपयांचा धनादेश ग्रामविस्तार अधिकारी सौ. लीना मोर्ये यांच्याकडे सुपूर्द केला.
शहरातील ग्रामीण मार्ग क्रमांक १०१ हा राष्ट्रीय महामार्ग पाटो पूल ते मच्छिमार्केट आसा जातो. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते. २२ मे रोजी पावसाळ्याच्या तोंडावर केबल टाकण्यासाठी खासगी मोबाईल कंपनीने स्थानिक प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता बेकायदा खोदाई केली. पावसाळ्यात डांबरीकरण करणे शक्य नसल्याने रस्त्याची डागडुजी करणे कठीण होते. याची माहिती मिळताच सरपंच अक्रम खान, ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत, जावेद खतीब, साईप्रसाद काणेकर, राजेश विरनोडकर यांनी आक्रमक पवित्रा घेत काम बंद पाडले. तसेच संबंधित ठेकेदाराला जाब विचारला. याबाबत बांदा पोलीस ठाण्यात प्रशासनाच्या वतीने लेखी तक्रार अर्ज देण्यात आला होता.


ग्रामपंचायतच्या कारवाईच्या बडग्यामुळे खासगी मोबाईल कंपनीने नमते घेत आपली चूक मान्य केली. खोदाई केलेल्या रस्त्याची डागडुजी करण्यासाठी १४ लाख ६२ हजार ५०० रुपयांचा धनादेश ग्रामपंचायतला सुपूर्द केला. आतापर्यंत कित्येकवेळा ठिकठिकाणी स्थानिक ग्रामपंचायतच्या हद्दीत खासगी मोबाईल कंपनीकडून बेकायदा रस्त्याची खोदाई करण्यात येते. मात्र अद्यापपर्यंत स्थानिक प्रशासनाला रास्ता दुरुस्तीसाठी भरपाई देण्यात येत नाही. बांदा ग्रामपंचायत प्रशासनाने मात्र आक्रमक भूमिका घेत तसेच ठेकेदारावर कारवाईचा बडगा उभारल्याने तात्काळ नुकसानभरपाईचा धनादेश अदा करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा