वाहनचालक व नागरिकांनी आ. राणे यांचे मानले आभार
वैभववाडी
तरळे – गगनबावडा मार्गाच्या झालेल्या दुरावस्थेवर आमदार नितेश राणे यांनी आवाज उठवताच संबंधित विभाग खडबडून जागा झाला आहे. कोकिसरे ते वैभववाडी नजीक रस्त्यातील खड्डे भरण्याचे युद्धपातळीवर काम राष्ट्रीय महामार्ग विभागाने सुरू केले आहे. सदर कामांमध्ये खंड न पडता करुळ घाटाचे काम हे युद्धपातळीवर करावे. अशी मागणी वाहन चालक व नागरिकांमधून केली जात आहे. करूळ घाट लवकर दुरुस्त न झाल्यास आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा आंदोलन उभारणार असा इशारा वैभववाडी भाजपच्या वतीने देण्यात आला आहे. तरळे – गगनबावडा या मार्गाची तसेच विशेषता करूळ घाटाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. घाटात वारंवार अपघाताचे सत्र सुरू आहे. चाळण झालेल्या करूळ घाटात आमदार नितेश राणे यांनी पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी कार्यकारी अभियंता श्री जाधव यांना खडे बोल सुनावले होते. रस्ता निर्धोक न झाल्यास मार्ग बंद करण्याचा इशारा राणे यांनी दिला होता. पुढील चार दिवसात डागडुजीचे काम हाती घेतो असे आश्वासन श्री जाधव यांनी दिले होते.
या पार्श्वभूमीवर कोकिसरे येथील खड्डे भरण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. काम सुरू झाल्याने वाहन चालक व नागरिकांनी आमदार नितेश राणे यांचे आभार मानले. परंतु सदर कामात खंड पडू न देता करूळ घाटाचे काम ही तात्काळ चालू करावे, करूळ घाट दुरुस्तीत चालढकल झाल्यास पुन्हा आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली जन आंदोलन उभारणार असा इशारा देण्यात आला आहे.