कणकवली :
मराठवाडा साहित्य परिषद परभणीतर्फे गेले काही दिवस मराठी साहित्यातील नामवंत व्यक्तींना निमंत्रित करून व्याख्यानाचे आयोजन करण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध कवी अजय कांडर यांचे व्याख्यान सदर परिषदेतर्फे रविवार १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता ऑनलाइन आयोजित करण्यात आले आहे. या व्याख्यानाचा आस्वाद साहित्य रसिकांनी घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक साहित्य अकादमी विजेते कथाकार आसाराम लोमटे आणि सहकाऱ्यांने केले आहे. मराठवाडा साहित्य परिषद परभणीतर्फे या कोरोनाच्या काळात विविध उपक्रम राबवले जात असून त्यातील ही व्याख्यानमाला हा महत्त्वाचा उपक्रम आहे. लेखक का लिहितो तो, लिहिण्यामागचा विचार कसा करतो, आपल्या भवतालकडे तो लेखक म्हणून कसा बघतो? या सगळ्याचा धांडोळा या व्याख्यानमालेत घेतला जात असून कवी कांडर हे आपल्या व्याख्यानात ‘मी का लिहितो? या विषयावर बोलणार आहेत.
कांडर यांच्या आवानओल, हत्ती इल्लो’ आणि ‘युगानुयुगे तूच या आत्तापर्यंत प्रकाशित झालेल्या तीन कविता संग्रहांनी मराठी कवितेत मोलाची भर घातली आहे.आपल्या सभोवताली असलेल्या राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेची चिरफाड अत्यंत संयमित शब्दात त्यांनी केली आहे.
खेड्यापाड्यातील स्त्रियांच्या जगण्याचा वेध त्यांनी आपल्या कवितेतून घेतला आहे. माणुसकीच्या प्राथमिक पातळीवरील मूल्यांचीही तमा न बाळगता होणारे सार्वत्रिक अधःपतन हे त्यांच्या कवितेच्या केंद्रस्थानी असल्याने त्यांच्या कवितेला थेट राजकीय विधानाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्वस्पर्शी नेतृत्वाला त्यांनी कवितेच्या माध्यमातून शब्दबद्ध केले आहे. विविध नियतकालिकांतून त्यांनी केलेले लेखन त्यांच्या चिंतनशीलवृत्तीची साक्ष देते. यामुळेच कांडर यांना ह्या व्याख्यानासाठी निमंत्रित करण्यात आल्याचे संयोजकांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.