मालवण
संस्थान आचरा गावच्या कोजागिरी पौर्णिमेपासून त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत गेला महिनाभर सुरू असलेल्या कार्तिकोत्सवाची सांगता शुक्रवारी झाली. गेला महिनाभर सुरू असलेल्या रात्रौ होणा-या पालखी सोहळ्याची सांगता त्रिपुरारी पौर्णिमे दिवशी रात्री दिपोत्सवाने तर विठ्ठल मंदिरात सुरू असलेल्या काकडा आरती ची सांगता सकाळी दहिहंडी फोडून करण्यात आली.या साठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती.
आचरा गावचा महिनाभर चालणारा उत्सव म्हणून कार्तिकोत्सव ओळखला जातो. या उत्सवाला कोजागिरी पौर्णिमेपासून सुरूवात होते. यात रोज रात्री पालखीची रामेश्वर मंदिरास सोमसूत्री प्रदक्षिणा घातली जाते. तर कोजागिरी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी पहाटेला रामेश्वर मंदिराला लागूनच असलेल्या विठ्ठल मंदिरात काकडा आरती महिनाभर चालू होती. या उत्सवात कार्तिक दशमीला आचरा वरची वाडी येथील नारायण मंदिराला तर कार्तिक एकादशी ला देवूळवाडी येथील विठ्ठल मंदिराला पालखीच्या भेटीचा सोहळा पारणे फेडणारा ठरला.
त्रिपुरारी पौर्णिमे दिवशी श्री देव रामेश्वर पंचमुखी महादेव स्वरूपात सजले होते वर्षातून काही ठराविक वेळी दर्शनाचा लाभ होणा-या या पंचमुखी महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची रीघ लागली होती. रात्रौ मंदिर परिसर हजारो दिव्यांनी उजळुन दिपोत्सव साजरा करण्यात आला.