*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य…लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक, श्रीशब्द समूह समन्वयक लेखक कवी दीपक पटेकर लिखीत अप्रतिम ललीतलेख*
*गुलाबी थंडीची पहाट*
कोकिळेचा “कुहू कुहू” असा मंजुळ ध्वनी अन् पक्षांचा किलबिलाट…कानावर पडताच, पहाट झाल्याची जणू काय आरोळीच झाली. सूर्याची सोनेरी किरणे आपल्या अंगा खांद्यावर लेवून झाडे, वेली, पाने, फुले किरणांच्या सोनेरी छटांमध्ये न्हाऊन गेली. माडाच्या झावळ्या नि झाडांच्या…पानांमधून सोनसळी किरणे डोकावू लागली…जणू काय भूवरी नवतरुणी अवतरली अन् तिचे यौवन पहायला, आपल्या डोळ्यांत साठवायला किरणेही आसुसलेली होती तशीच…!
ऊन कोवळे पहाट काळी
पानांमधुनी पहा झिरपले
शाल ओढुनी धरणीवरती
शुभ्र धवल ते धुके उतरले
तळ्याकाठच्या झाडीने….पाण्याचे शुभ्र धवल धुक्याची शाल पांघरली होती….हळुवार वाऱ्याच्या झुळुकेने…..थंडीने गारठलेलं पाणी हवेत वाफा सोडत होतं…तशाच वाफा पाण्यावर उठत होत्या. रात्रभर शांत पहुडलेलं पाणी नुकतंच पहाटेच्या आगमनासाठी आतुर झालं होतं…धुक्याचा दुलईतून वाट शोधत पक्षीही शांत विहार करत उजाडणाऱ्या नव्या गुलाबी पहाटेच्या स्वागतासाठी आतुरले होते….रात्रीच्या काळोखात आपल्या पंखांवर दवबिंदूंचे तुषार झेलून भिजलेलं ओलं अंग सुकविण्यासाठी…बोचऱ्या थंडीत किरणांची उबदार रजई ओढण्यासाठी काळाकुट्ट पाणपक्षी पंख पसरवून पहाटकाळी येणाऱ्या सूर्याच्या सोनेरी किरणांची चातक पक्षासारखीच वाट पाहत होता…
अंधार लपेटलेल्या पहाटेस पाय मोकळे करणारी कितीतरी माणसे हृदयाची धडधड वाढवत… अंगावर थंडीची शिरशिरी झेलत…थंडीने फाटलेल्या अधर पाकळ्यांना गुलकंद प्यायलेल्या जिभेने कुरवाळत धुक्यातून वाट काढत पायाखालच्या तृणपातीवरील दवबिंदू तुडवत रोमारोमावर काटा उभा करीत मार्ग काढत फिरत होती…तोंडातून निघणाऱ्या थंडीच्या वाफा…अंगात असणाऱ्या उष्णतेला हवेतील गारव्याने मारलेली अलगद मिठी न बोलताच सांगून जात होत्या….अंगावर उभा राहणारा काटा….. गर्मी अन् गारव्याच्या मिलनाची साक्ष देत उभा होता…जणू त्यांचं मिलन तो चोरून पाहत होता…
फुलांच्या पाकळ्यांवरील दवबिंदू पाकळ्यांशी गुंजन करत होते…पाकळ्यांच्या मनातील भेद काही क्षण का होईना ते….क्षणिक जीवन असेपर्यंत…हवेतच खोलत होते.
उमलणाऱ्या कोमल पाकळ्या…भुंग्यांनी कुरतडण्याची भीती बाळगून फुलायचे सोडत नव्हत्या…..तर आनंद देण्यासाठी प्रत्येक क्षणी गोड हसत फुलत जायचं असा संदेश देत…तशाच गोड हसत उमलत…फुलत होत्या.
सोनेरी किरणांनी आपला पसारा वाढवताच…पक्षांचा चिवचिवाट वाढू लागला… पहाटेची सोनेरी किरणे पाण्यावर तरंगू लागली… हवेतील गारवा…थंडीची लाट अन् पाण्याच्या अंतरंगातील उष्णता पाण्यावर बाष्प लहरी पसरवीत होत्या…जणू पाण्याला आपल्या मऊ, उबदार स्पर्शाने निद्रेच्या स्वाधीन करत होत्या…परावर्तित होणारी सोनेरी किरणे डोळे दिपवून टाकत होती…तळ्याच्या काठाला सोनेरी किनार लावत होती…जणू काय सृष्टीने जरिकाठाची साडी नेसावी आणि आपल्या अनन्यसाधारण सौंदर्याने धरणीला भारून टाकावे….तशीच धरणी सजू लागली..
सूर्याच्या तेजाने सोनसळी किरणांनी झाडे वेली पाने फुले चमकू लागली…..
दवबिंदूंचे नाजूक तुषार पानांवरून लटकेच गळू लागले…माळेतून निसटून हिरे मोती सांडावेत अगदी तसेच सांडू लागले…धरणीच्या कुशीत शिरताच लुप्त होऊ लागले…
तृणपात्यांवर चमकणारे
दवबिंदू,जणू भासती मोती..
येता सोनेरी किरणे तेजस्वी
न जाणो का क्षणात लुप्त होती..
सोनेरी किरणांनी रूप बदलून चंदेरी प्रकाश पसरला….काळीकुट्ट रात्र मिटून ही गुलाबी थंडीची पहाट सूर्याची तेजस्वी किरणे लेवुनी नव्या दिवसाची….नव्या आशेची….नवं वर्षाच्या नव्या इच्छा आकांक्षा घेऊन धरतीवर अवतरली…!!
©[दीपी]
दीपक पटेकर, सावंतवाडी