You are currently viewing अहोरात्र मेहनत घेत उद्योगाची कास धरल्यास यश हमखास – सुनील नारकर

अहोरात्र मेहनत घेत उद्योगाची कास धरल्यास यश हमखास – सुनील नारकर

कणकवली

आपल्या समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न होतोय ही आनंदाची बाब आहे. चर्मकार समाजातील अनेकांनी आपल्या बुद्धी आणि हुशारीच्या बळावर आपले उच्च स्थान निर्माण केले आहे. सधन झालेल्या आपल्या व्यक्तींनी आपल्या समाजातील दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांचे पालकत्व घेणे आवश्यक आहे. शिक्षणानंतर उद्योगाची कास धरताना अहोरात्र मेहनत करायची तयारी ठेवा. आयुष्यातील चढ उताराना धैर्याने सामोरे जा, यश निश्चित मिळेलच असे प्रतिपादन महाराष्ट्र शासन समाज सेवक पुरस्कार प्राप्त उद्योजक तथा कार्यक्रमाचे उदघाटक सुनील नारकर यांनी केले.

सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ शाखा कणकवली च्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव आणि स्नेहमेळाव्याचे उदघाटन उद्योजक सुनील नारकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून, संत रविदास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पून उद्योजक तथा सावली फाउंडेशन चे अध्यक्ष गणेश जाधव, उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त उपप्रबंधक हमीदभाई पटेल, तालुकाध्यक्ष महानंदा चव्हाण, जिल्हाध्यक्ष सुजित जाधव , माजी जिल्हाध्यक्ष विजय चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत मराठा मंडळ सभागृह कणकवली येथे करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार रमेश पवार, नगरसेवक ॲड.विराज भोसले, आत्माराम ओटवणेकर, चंद्रसेन पाताडे, नामदेव जाधव, शरद जाधव, चंदू भोसले, अण्णा सरमळकर, सुरेश पवार,अनिल चव्हाण, राजेंद्र जाधव, आनंद जाधव, शरद नारकर, प्रकाश वाघेरकर, लवेंद्र किंजवडेकर ,सत्यविजय जाधव, राजन वालावलकर, अभियंता विजय चव्हाण आदी उपस्थित होते.

यावेळी  सुनील नारकर यांनी आपल्या स्पष्टवक्तेपणाची झलक देत माझ्यासारखा उद्योजक असलेला आपला समाजबांधव संघटनेला कधी दिसला ? जिल्ह्याचे टोक असलेल्या आमच्या खेडेगावात संघटना का पोचत नाही ? असे खडे बोलही सुनावले. पक्षीय राजकारणात वेगवेगळे झेंडे घेतलात तरी सर्व समाजात वावरताना आपल्या चर्मकार संघटनेचा एकच झेंडा हाती घेत एकजूट ठेवा असा सल्लाही नारकर यांनी दिला. उपस्थितांना मार्गदर्शन करताना चर्मकार समाज भवन निर्मितीसाठी लागणारे योगदान देण्याची ग्वाही नारकर यांनी दिली.

जिल्हाध्यक्ष सुजित जाधव यांनी आपल्या मनोगतात संत रविदास समाज भवनाला ज्ञातीबांधवांनी आर्थिक सहाय्य करण्याचे आवाहन करताना सांगितले की संत रविदास समाज भवन प्रगतीपथावर आहे. संत रविदास समाज भवन आपल्या समाजाची अस्मिता आहे. समाजभवन निर्मितीसाठी आर्थिक निधीची गरज आहे. आपल्या ज्ञातीबंधवांनी सढळ हस्ते आर्थिक मदत करून समाज भवनाचे स्वप्न पूर्ण करण्यास हातभार लावावा. यावेळी पुढे बोलताना जाधव म्हणाले की सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ ही संघटना नेहमीच समाजबांधवांच्या अडीअडचणीच्या काळात त्यांच्यासोबत राहिली आहे. यापुढेही समाजबांधवांच्या साथीला आपली संघटना नेहमीच सज्ज असेल.

यावेळी गटविकास अधिकारी तथा संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष विजय चव्हाण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना राजकीय
सत्ताकेंद्र ताब्यात असतील तर आपल्या समाजाच्या समस्या नक्कीच मार्गी लागतील. जिल्ह्यात सरपंच पं.स.सदस्य जि.प. सदस्य निवडणूका होऊ घातल्या आहेत.या सार्वत्रिक निवडणुकांत आपल्या समाजाने आगामी निवडणुकांत चर्मकार समाजाने जास्तीत जास्त सत्ताकेंद्रात स्थान मिळवावे असे आवाहन केले. जिल्हा सचिव चंद्रसेन पाताडे यांनी संत रविदास समाज भवन उभारणीमागचा उद्देश आणि आवश्यक असणारे आर्थिक सहकार्य याबाबत विवेचन केले. प्रांताधिकारी राजमाने, तहसीलदार पवार यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. विविध शालांत तसेच व्यवसायिक परीक्षांमध्ये उज्ज्वल यश मिळविलेल्या तालुक्यातील समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच समाजातील सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांचाही शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.तालुक्यातील चर्मकार समाजातील भजनी बुवांनाही शाल श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंद जाधव यांनी केले. सूत्रसंचालन व आभार अविनाश चव्हाण यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 3 =