You are currently viewing एसटीचे आंतरिक सौंदर्य जपून नुकसानदायक बाबी थांबवा : संविधान परिवारची मागणी

एसटीचे आंतरिक सौंदर्य जपून नुकसानदायक बाबी थांबवा : संविधान परिवारची मागणी

इचलकरंजी / प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या
एसटी बसमधील आंतरिक सौंदर्य जपून नुकसानदायक बाबी थांबवाव्यात या मागणीचे निवेदन आज इचलकरंजी येथे संविधान परिवारच्या वतीने मध्यवर्ती बसस्थानक आगार वरिष्ठ व्यवस्थापक संतोष बोगरे यांना सादर करण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून एसटी बसेसचे अनेक प्रकारचे विद्रुपीकरण हा सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीचा मुद्दा प्रवाशांच्यात सातत्याने चर्चेला येत असतो.त्याला तोंड फोडत संविधान परिवारच्या कार्यकर्त्यांनी आज इचलकरंजी येथे मध्यवर्ती एसटी आगारप्रमुखांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन त्यांच्याकडे सादर केले.या निवेदनात ,
जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा म्हणून नोंदवल्या जावू शकतील अशा अवैज्ञानिक दावे करणा-या भोंदूबाबांची जाहिरात एसटी बसेसमध्ये चिकटवलेली असते. यावर निर्बंध घालावेत आणि कारवाई करावी.
काही एसटी चालक तथा वाहक आपल्या गाडीत आपल्या धर्माच्या देवी-देवतांचे आणि बुवा-बाबा-महाराजांचे फोटो लावून पूजा करताना आढळले आहेत. भारतीय संविधानातील धर्मनिरपेक्षता या मुल्याचे उल्लंघन करणारी ही कृती योग्य नाही. त्यांनी आपल्या श्रद्धा आणि उपासनेचा अधिकार बजावण्याची ही जागा नाही .याबद्दल आगार प्रमुखांनी स्पष्ट सूचनांचे निर्देश करणारे परिपत्रक जारी करावे.
एसटीमध्ये सण, उत्सव, धार्मिक फोटो, घोषवाक्ये लिहिली जातात.विविध धर्माच्या देवांची प्रतिके, छायाचित्रे, धार्मिक चिन्हे लावली जातात. भारतीय संविधानात जनतेला धर्मपालनाचा अधिकार असला आणि शासन त्या अधिकाराला संरक्षण देणारे असले तरी शासनाला स्वतःचा धर्म नसेल, असे म्हटले आहे. त्यामुळे सरकारी मालकीच्या सर्व नागरिकांची सोय असलेल्या एसटीला स्वच्छ ,सुंदर ठेवण्याबाबत प्रशासनाने सजग रहावे.
एसटीच्या आतील स्वच्छता आणि सॅनिटायजेशन या बाबतीत आगारप्रमुखांनी आग्रही रहावे. तिकिट घेतले कि नाही या तपासणीसोबत भरारी पथकाने या बाबतीत काम केले आणि निरीक्षणे नोंदवली तर विद्रूपीकरण थांबवले जाईल. एसटी मध्ये कोणत्याही प्रकारचे व्यसन केले जावू नये यासाठीचा मज्जाव स्पष्ट सूचनांद्वारे एसटीत केला जावा ,असा उल्लेख करण्यात आला आहे.तसेच
अशा प्रकारच्या गोष्टी थांबवण्यासाठी तातडीने पावले उचलावीत ,अशी मागणी देखील करण्यात आली आहे.
सदरचे निवेदन इचलकरंजी मध्यवर्ती एसटी बसस्थानक आगार वरिष्ठ व्यवस्थापक संतोष बोगरे यांच्याकडे सादर करण्यात आले.
यावेळी संविधान परिवारचे अमोल पाटील, दामोदर कोळी, रोहित दळवी,स्नेहल माळी,अशोक वरुटे आणि वैभवी आढाव आदि उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one + 1 =