प्रत्येक घरातून किमान पाच पणत्या लावण्याचे आवाहन…
सावंतवाडी
त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने सावंतवाडी शहरातील विठ्ठल, आत्मेश्वर, दत्त मंदिरात नागरिकांनी दीपोत्सव साजरा करावा. त्यासाठी सर्व माता-भगिनींनी प्रत्येक घरातून किमान पाच पणत्या लावाव्यात, असे आवाहन सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केले आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्र दिले आहे.
यात असे नमुद केले आहे की, काही मंदिरांमध्ये पूर्वीपासून त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने दीपोत्सव होत आहे. शहराची वेगळी ओळख निर्माण करण्याच्या दृष्टीने एक प्रयत्न म्हणून यावर्षीपासून प्रत्येक मंदिरामध्ये त्या?त्या भागातील व्यवस्थापनाने दीपोत्सवामध्ये सहभागी व्हावे, यासाठी सर्व मंदिर व्यवस्थापनाला भेटून विनंती करण्यात येणार आहे. या दीपोत्सवामध्ये पारंपारिक पणत्या लावून दीपोत्सव करावा, अशीही सूचना बबन साळगावकर यांनी दिली आहे. कुठेही मंदिरामध्ये मेणबत्तीचा वापर करण्यात येऊ नये, उत्सव सर्व मंदिरामध्ये साजरा करून मंदिर प्रशासनाने सावंतवाडी शहराची वेगळी ओळख निर्माण करावी, तसेच उत्सवामध्ये महिलांनी मोठा सहभाग दर्शवावा व सावंतवाडी शहरातील या दिपोत्सवासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवहन करण्यात आले आहे.