क्रेडाई सावंतवाडी पदाधिकारी यांचे सहाय्यक संचालक, नगररचनाकार यांना निवेदन सादर
ओरोस
क्रेडाई सावंतवाडी पदाधिकारी यांनी सहाय्यक संचालक, नगररचना, सिंधुदुर्गनगरी, ओरोस यांची इमारतीचे आराखडे तसेच रेखांकन मंजुरीची प्रकरणे ऑफलाइन स्वीकारणे बाबत भेट घेऊन निवेदन सादर केले.
नगररचना कार्यालयात अभिप्रायासाठी तसेच मंजुरीसाठी प्रकरणे येत असतात. अलीकडेच १ जुलै २०२२ पासून आलेली प्रकरणे ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यासंबंधी त्यांच्या कार्यालयाकडे आदेश प्राप्त झालेले आहेत. परंतु ग्रामपंचायतीकडे तांत्रिक मनुष्यबळ आणि ऑनलाईन प्रणाली उपलब्ध नसल्यामुळे नगरपंचायत व नगरपालिका क्षेत्र वगळता संपूर्ण जिल्ह्यामधील बांधकाम मंजुरीची तसेच बिनशेतीची सर्व प्रकरणे सदरच्या ग्रामपंचायती ऑफलाइन पद्धतीने ओरोस नगररचना कार्यालयात प्रकरणे पाठवीत आहेत. परंतु शासन आदेशामुळे नगररचना कार्यालयाकडून सदरच्या प्रकरणांना मंजुरी प्राप्त कठीण झाले आहे. त्यामुळे नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्र वगळता सर्व भागातील बांधकामे खोळंबून राहिलेली आहेत. याच वेळी मटेरियल व कामगारांचे दर दिवसेंदिवस वाढत असून त्याचाही परिणाम इमारत बांधणीवर होत आहे.या सर्वांचा त्रास बांधकाम व्यावसायिकांबरोबरचं सर्वसामान्य ग्रामीण जनतेला त्यांच्या वैयत्तिक घराच्या बांधकामांवर होत आहे.
त्यामुळे ऑनलाइन यंत्रणा पूर्ण पणे सक्षम होई पर्यंत आराखडे व रेखांकनांच्या प्रकरणांना पूर्वीप्रमाणेच ऑफलाइन पध्दतीने मंजुरी देण्यात यावी यांसाठी क्रेडाई, सावंतवाडीचे अध्यक्ष नीरज देसाई, उपाध्यक्ष शरद सावंत, सचिव गोविंद खोर्जुवेकर, कोषाध्यक्ष यशवंत नाईक आणि सतीश बागवे, संजय सावंत आदी सदस्यांनी सहाय्यक संचालक सिंधुदुर्ग विद्याधर देसाई व नगररचनाकार सिंधुदुर्ग चंद्रशेखर तायशेटे यांची भेट घेतली.