You are currently viewing आक्रमक पर्यटन व्यावसायिकांची मालवण तहसील कार्यालयावर धडक

आक्रमक पर्यटन व्यावसायिकांची मालवण तहसील कार्यालयावर धडक

समस्यांचा वाचला पाढा ; पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवरही उपस्थित केले सवाल : प्रशासनाने बोलावली तातडीची बैठक

मालवण

मालवणात येणाऱ्या काही पर्यटकांकडून स्थानिक पर्यटन व्यवसायिकांना मारहाण करण्याच्या घटना घडत असून याबाबत पोलीस यंत्रणा गांभीर्याने घेत नाही. सहकार्य दाखवत नाही. स्थानिक व्यसायिकांवरच गुन्हे दाखल करत असून याबाबत तहसील प्रशासनाने लक्ष द्यावे, अन्यथा व्यवसायांना प्रशासनेच कुलूप लावून ते बंद करावेत, अशी आक्रमक भूमिका जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाने मालवण तहसील प्रशासनासमोर मांडत तीव्र नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, पर्यटन व्यवसायिकांवर पर्यटकांकडून होणाऱ्या हल्ल्याबाबत व व्यावसायिकांच्या समस्यांबाबत प्रशासनाने ठोस भूमिका घ्यावी यासाठी सर्व प्रशासकीय विभागांची व्यवसायिकांसोबत एकत्र बैठक घेण्याची मागणी पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी केली. याला सकारात्मक प्रतिसाद देत नायब तहसीलदार आनंद मालवणकर यांनी गुरुवार ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता तहसील कार्यालयात बैठक घेण्याचे निश्चित केले.

मालवणात पर्यटन व्यावसायिकांवर गेल्या काही दिवसात पर्यटकांकडून होणाऱ्या हल्ल्यांबाबत ठोस भूमिका ठरवण्यासाठी चिवला बीच येथे जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या पदाधिकारी व व्यावसायिकांची बैठक होऊन चर्चा झाली. यानंतर व्यावसायिकांनी तहसील कार्यालय येथे नायब तहसीलदार आनंद मालवणकर व गंगाराम कोकरे यांची भेट घेऊन व्यावसायिकांच्या व्यथा मांडली. यावेळी अध्यक्ष बाबा मोंडकर, रविकिरण तोरसकर, शहराध्यक्ष मंगेश जावकर, महिला आघाडीच्या सौ. अन्वेषा आचरेकर, मेघा सावंत, सौ. आर्या मयेकर, विनय गावकर, मिलिंद झाड, सौ. विद्या फर्नांडिस, रुपेश प्रभू, दादा वेंगुर्लेकर, प्रसन्न मयेकर, सौ. नमिता गावकर, रामा चोपडेकर, रुपेश सातार्डेकर, दर्शन वेंगुर्लेकर, नरेश कालमेथर, भिवा शिरोडकर, रुपेश प्रभू, मंगेश जावकर व इतर व्यावसायिक उपस्थित होते.

पर्यटन व्यवसायिकांवर काही पर्यटकांकडून हल्ले होत असताना याबाबत पोलिसांचे कोणतेही सहकार्य मिळत नाही. यापुढे आम्ही सहन करणार नाही. न्याय मिळत नसेल तर पोलिसांकडे का जावे असा प्रश्न आता आम्हाला पडला आहे. प्रशासनामध्येही समन्वय दिसून येत नाही, स्थानिक व्यवसायिकांना प्रशासनाचे सहकार्य, पाठिंबा नाही तर प्रशासकीय यंत्रणा हव्यात कशाला असे यावेळी बाबा मोंडकर व उपस्थित व्यावसायिकांनी सांगत पोलीस व प्रशासनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. आता आमच्या डोक्यावरून पाणी जात असून व्यवसायिकांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत प्रशासनाला कारवाई करणे जमत नसेल तर आमच्या व्यवसायाला प्रशासनानेच कुलूप लावून व्यवसाय बंद करावा, असे यावेळी व्यावसायिकांनी सांगत नायब तहसीलदार आनंद मालवणकर यांच्याकडे प्रतिकात्मक कुलुप सुपूर्द केले.

भाजप नेते निलेश राणे यांची भेट

व्यावसायिकांनी मालवण दौऱ्यावर असलेल्या माजी खासदार निलेश राणे यांचीही भेट घेत पर्यटन व्यावसायीकाना येणाऱ्या समस्या मांडल्या. पर्यटन व्यावसायीक यांना लागेल ते सहकार्य करू असा शब्द निलेश राणे यांनी यावेळी दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 3 =