कणकवली
शासनाच्या रास्त धान्य दुकानात ऑनलाईन पद्धतीने धान्य दिले जाते. सर्व्हर डाऊन असल्यामुळे ग्राहकांची ऑनलाईन नोंदणी होण्यात अडचणी येत आहेत. ऑफलाइन धान्य वितरित करा अन्यथा आंदोलन असा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष विजय प्रभू यांनी दिला आहे.
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी लोक लांबून पायपीट करत येतात तासनतास थांबतात पैशाचा आणि वेळेचा अपव्यय होतो आणि येवढे करून ऑनलाईन नोंदणी होत नाही. यामुळे ब-याच जणाना दिवळीच्या दिवसात आपल्या हक्काचे धान्य मिळाले नाही. महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या सरकारने स्वतःच्या राजकीय फाद्यासाठी आनंदाचा शिधा ऑफलाईन पद्धतीने वितरीत केला मग तुमचा सर्व्हर डाऊन असेल आणि त्यामुळे ग्राहकांची ऑनलाईन नोंदणी होत नसेल तर जसा आनंदाचा शिधा ऑफलाईन वितरीत केला तश्या प्रकारे हे दर महिन्याला वितरीत केले जाणारे धान्य का वितरीत केले जात नाही? सर्व्हर डाऊन असल्यामुळे लोकांनी किती वेळा रेशन दुकानावर येवून आपला काम धंदा सोडून स्वतःला त्रास करून घ्यायचा. अधिकारी म्हणतात की सर्व्हर डाऊन असल्यामुळे लोकांना फार त्रास सहन करावा लागतो परंतू ऑफलाईन पद्धतीने धान्य वितरीत करण्याचा निर्णय हा धोरणात्मक असून सरकारने हा निर्णय घेतला पाहिजे. सध्या सरकारमध्ये असलेले खोके मोजण्यात व स्वतःच्या अस्तीत्वाच्या राजकारणात व्यस्त असून गोरगरिब जनतेकडे लक्ष देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. म्हणून आमची सरकारकडे मागणी आहे की ज्यांना ऑक्टोबरचे धान्य मिळाले नाही तसेच नोव्हेंबरच्या धान्यासाठी ज्यांची ऑनलाईन नोंदणी झाली नाही, त्यांना आणि पुढे सर्व्हरचा प्रश्न मार्गी लागत नाही तो पर्यंत ऑफलाईन पद्धतीने धान्य वितरीत केले जावे अन्यथा अन्यायग्रस्त जनतेला सोबत घेऊन आंदोलन करावे लागेल असा इशारा तेंडोली सोसायटीचे चेअरमन व सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष विजय प्रभू यांनी दिला आहे.