लाईफ गार्ड संजय नार्वेकरांचे प्रसंगावधान; सूचनांचे पालन करा, मनोज उगवेकर…
वेंगुर्ले
शिरोडा-वेळागर समुद्रामध्ये पाण्याचा अंदाज न आल्याने बुडणाऱ्या गडींग्लज येथील दोन महिला पर्यटकांना येथील लाईफ गार्ड संजय नार्वेकर यांच्या प्रसंगावधानामुळे वाचविण्यात यश आले. ही घटना आज सायंकाळी ५:०० वाजण्याच्या सुमारास घडली. गडींग्लज येथील सौ. रेखा बेसुरे (४५ )आणि स्वाती बेसुरे (२१) , अशी त्यांची नावे आहेत.
संबंधित दोन्ही महिला पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी शिरोडा येथे आले होते. वेळागर समुद्र किनारी आल्या नंतर त्यांना पाण्यात आंघोळीचा मोह आवरता आला नाही आणि ते पाण्यात उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते खोल पाण्यात जाऊन बुडू लागले. हे लाईफ गार्ड संजय नार्वेकर यांच्या लक्षात येतच त्यांनी पाण्यात उडी मारून बुडणाऱ्या त्या दोन्ही महिलांना सुखरूप पणे बाहेर काढले. दरम्यान शिरोडा समुद्र किनारी वाढते अपघात रोखण्यासाठी व पर्यटकांना योग्य सोयी सुविधा मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायत सर्व स्तरावर प्रयत्नशील असून पर्यटकांनी शिरोडा ग्रामपंचायत व शिरोडा पोलीस स्टेशन यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन सरपंच मनोज उगवेकर यांनी केले आहे.