दिगंबर नाईक यांचे छायाचित्र असलेले टपाल तिकीट प्रकाशित…

दिगंबर नाईक यांचे छायाचित्र असलेले टपाल तिकीट प्रकाशित…

मालवणी माणूस अभिनेता दिगंबर नाईक यांचा सन्मान

मुंबई

जागतिक टपाल दिनाचे औचित्य साधून सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली गावचे सुपुत्र मराठी सिने नाट्यअभिनेते दिगंबर नाईक त्यांचा भारतीय टपाल खात्याने मोठा सन्मान केला आहे. सिने-नाट्य, कला व सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल दिगंबर नाईकचे छायाचित्र असलेले टपाल तिकीट प्रकाशित करण्यात आले आहे. तसेच भारतीय पोस्टाचे ब्रँड ॲम्बेसिडर म्हणूनही यांची निवड करण्यात आली आहे.

या निवडीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचाही नावलौकिक वाढला आहे. या निमित्ताने अतिशय सामान्य कुटुंबातील होतकरू मुलाचे, कोकणच्या मातीतील कलाकाराचे, आपल्या अभिनयाने कलाक्षेत्रात, चित्रपट-नाट्यक्षेत्रात एक वेगळाच मानदंड प्रस्थापित करणाऱ्या तसेच राजकीय क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने सगळ्यांची मन जिंकणाऱ्या गुणी अभिनेत्याचा गौरवच झाला आहे.

अलीकडेच सावंतवाडीच्या लाकडी खेळण्यांना भारतीय डाक सेवेच्या तिकिटावर स्थान मिळाले होते. या सन्माना बरोबरच भारतीय डाक खात्याने दिगंबर नाईक यांच्या रूपाने एका मालवणी माणसाला तिकिटावर स्थान देऊन सावंतवाडी च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.

स्व. मच्छिंद्र कांबळी यांच्यानंतर मालवणी बोली भाषा सातासमुद्रापार नेणारे दिगंबर नाईक यांना मालवणी मातीतील कलाकार म्हणून भारतीय डाक विभागाच्या तिकिटावर स्थान देण्यात आले आहे.यानिमित्ताने प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका मालवणी कलाकाराचा भारतीय डाक विभागाने सन्मान केला आहे. विशेष म्हणजे दिगंबर नाईक यांचा फोटो असलेली पाचशे रुपयांची तिकिटे प्रथमच विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत.

गुरुवारी सायंकाळी दादर येथे झालेल्या कार्यक्रमात या तिकिटाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी पोस्टाचे वरिष्ठ अधिकारी बी एस पठारे, एस. एल . परब बाळा चौकेकर, सुरेंद्र पालव आदी यावेळी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा