You are currently viewing मसुरे येथील पावणाई देवी महिला दूध उत्पादक संस्थेने एक अनोखा उपक्रम..

मसुरे येथील पावणाई देवी महिला दूध उत्पादक संस्थेने एक अनोखा उपक्रम..

मसुरे :

मसुरे येथील पावणाई देवी महिला दूध उत्पादक संस्था मसुरे यांच्या वतीने आणि जिल्हा बँक सिंधुदुर्ग, अण्णासाहेब पाटील महामंडळ आणि गोकुळ दूध उत्पादक संघ कोल्हापूर यांच्या सहकार्यातून मसुरे परिसरातील शेतकऱ्यांना दूध उत्पादन करण्यासाठी 25 म्हैशी अनुदान पर तत्त्वावरती रोजगार निर्मिती म्हणून देण्यात आल्या असून मसुरे येथील पावणाई देवी महिला दूध उत्पादक संस्थेने एक अनोखा उपक्रम राबविला आहे. यामुळे मसुरे परिसरातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी दूध उत्पादनातून निर्माण झाली आहे. याबाबत येथील शेतकऱ्यांनी या संस्थेचे, सिंधुदुर्ग जिल्हा बँक मसुरे शाखा आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी तसेच अण्णासाहेब पाटील महामंडळ आणि गोकुळ दूध उत्पादक संघ कोल्हापूर यांचे आभार व्यक्त केले आहे. अशा पद्धतीने मसुरे परिसरामध्ये दूध उत्पादनाची नवीन रोजगाराची संधी उपलब्ध झाली असून एक प्रकारची क्रांती घडून आली आहे.

मसुरे येथील पावणाई देवी महिला दूध उत्पादक संस्था ही सद्यस्थितीत चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांसाठी दूध उत्पादन करण्यासाठी पाठीशी आहे. याच अनुषंगाने या संस्थेने मसुरे परिसरातील शेतकऱ्यांसाठी हरियाणा राज्यातून रिंग मुरा व मुरा जातीच्या 25 म्हैशि खरेदी करून मसुरे येथे प्रायोगिक स्वरूपाच्या तत्त्वावरती एक उपक्रम म्हणून आणून येथील बारा शेतकऱ्यांना गुरुवारी सकाळी वितरित करण्यात आल्या. या जातीतील एक म्हैस सुमारे 15 लिटर दिवसाला दूध देत असून यातून सुमारे सातशे रुपयाचे उत्पादन शेतकऱ्याला मिळणार आहे. यासाठी प्रति दीन दिवसाला सुमारे 250 रुपये ते 300 रुपये खर्च होत आहे. येथील शेतकऱ्यांची बेरोजगारी दूर करण्यासाठी दूध उत्पादनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सधन करण्यासाठी पावणाई देवी महिला दूध उत्पादक संस्थेच्या अध्यक्षा सौ. अलका साठे तसेच डॉक्टर विश्वास साठे यांनी पुढाकार घेऊन येथील शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले आहे. मसुरे बांदिवडे येथे या सर्व म्हशी संबंधित लाभार्थ्यांना वितरित करण्यात आल्या.

यावेळी सौ अलका साठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर विश्वास साठे, शामा सावंत, बांदीवडे माजी सरपंच सतीश बांदिवडेकर, पांडुरंग ठाकूर, सिद्धेश मसूरकर, आबा मसुरकर, तुळशीदास चव्हाण, स्वप्निल ठाकूर, अभी घाडीगावकर, जय बांदिवडेकर, मारुती सावंत, सिद्धेश दू, सुमेध सावंत, अभी दुखंडे, सिद्धेश गिरकर, गणेश बांदिवडेकर, लखन बांदिवडेकर, महेंद्र हिरलेकर आणि हरियाणा येथील मार्गदर्शक शेतकरी आदी उपस्थित होते. जिल्हा बँकेच्या वतीने येथील शेतकऱ्यांना अनुदान पर कर्ज सहकार्य केले असून अण्णासाहेब पाटील महामंडळानेही या योजनेमध्ये मोठे सहकार्य लाभार्थ्यांना केले आहे.

मसुरे परिसरातील शेतकरी बांधवांनी हरियाणा येथे जाऊन या दुधाळ म्हैशींची पाहणी करून माहिती घेतली होती. यावेळी बोलताना डॉक्टर साठे म्हणाले प्रायोगिक तत्त्वावरती या दूध उत्पादक संस्थेने येथील शेतकऱ्यांना सधन बनवण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला असून यातून शेतकऱ्यांनी आपली उन्नती साधावी. भविष्यातही येथील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम हाती घेण्यात येतील. या सर्व शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा बँक मसुरे शाखा, अण्णासाहेब पाटील महामंडळ, गोकुळ दूध उत्पादक संघ यांचे मनापासून आभार व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा