*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*
कार्तिक महिन्यातल्या तेराव्या दिवशी धनतेरस साजरी केली जाते. धन म्हणजे संपत्ती. आणि तेरस म्हणजे तेरा. म्हणून कार्तिक कृष्ण त्रयोदशीला धनत्रयोदशी असे म्हणतात. या दिवशी मृत्युदेवता यम आणि भगवान धन्वंतरीची पूजा केली जाते. या दिवशी पहाटे उठून, पूजापाठ केला जातो. अंगण सारवून रांगोळ्या घालतात. घर सजवले जाते. आणि दिवाळीच्या शुभेच्छा देउन सर्वत्रआनंद मनवला जातो.
नवीन भांडी खरेदी करणे हेही शुभ मानले जाते. या दिवशी भगवान धन्वंतरी अमृतकलश घेऊन प्रकटले म्हणून त्यांची पूजा केली जाते.यामागे संकल्पना अशी आहे की आरोग्यंधनसंपदा…खरी संपत्ती म्हणजे निरोगी शरीर. धनत्रयोदशीचा संबंध या आरोग्य संपदेशी आहे. म्हणून भगवान धन्वंतरीची पूजा प्रामुख्याने असते. आणि मृत्युचे भय निवारण व्हावे म्हणून यमालाही पूजतात.
यामागे एक कथा अशी आहे की, राजा हिमाच्या मुलाचा, विवाहानंतर चौदा दिवसांनी मृत्यु होणार, हे भविष्य असते. मात्र त्याची पत्नी चौदाव्या दिवशी रात्रभर पतीला जागे ठेवते, त्याकरिता रात्रभर ती अभंग भजन ओव्या गाते. अलंकाराचे, धन धान्याचे, द्रव्याचे ढीग दरवाजात ठेवते. यमाचे आगमन होते. मात्र धनराशीमुळे तो आत येऊ शकत नाही आणि तिथेच अभंगवाणी ऐकण्यात रमतो. मग पहाट होते. मरणवेळ टळते. आणि यम माघारी जातो. हिमाच्या मुलाला जीवदान मिळते. तो दिवस कार्तिक कृष्ण तेरावा दिवस. म्हणूनच या दिवशी धनाची आणि यमाचीही पूजा केली जाते…या दिवसासमवेत अनेक कथा आहेत. विष्णुने वामनावतार घेऊन देवांना त्रास देणार्या बळीचा बिमोड केला. देवांचे लुटलेले धन परत मिळवले आणि ते कित्येक पटीने वाढलेले होते. हा विजयाचा आणि आनंदाचा सोहळा धनाची पूजा करून साजरा केला जातो. तेरापटीने धन वाढते अशीही समजूत आहे.
परंपरा, रीतभात, यापलीकडे जाऊन या धनत्रयोदशीचा विचार केला तर, जे काही आपल्याकडे आहे. आपण मिळवले, आपल्या भाग्यानी दिले त्यास मनोभावे पूज्य मानून समाधानात जगावे. समाधान, शांती यामुळे मन आणि शरीर निरोगी राहते आणि आरोग्यसंपदेचेच वर्धन होते…हा सद्भाव या धनतेरसच्या निमीत्ताने जपावा..
आनंदी रहावे..आनंद वाटावा..आनंदच बहरावा…
सौ. राधिका भांडारकर पुणे