आत्महत्येचे कारण अस्पष्ट ; पोलिसांकडून तपास सुरू …
मालवण
तालुक्यातील वडाचापाट नवपाटवाडी येथे काही महिन्यांपासून वास्तव्यास असलेल्या वैष्णवी प्रशांत गुरव (वय- १७) मूळ रा. आंगणेवाडी ता. मालवण हिचा मृतदेह राहत असलेल्या घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास लावलेल्या स्थितीत आज दुपारी दिसून आला. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करत येथील पोलीस अधिक तपास करत आहेत.
शाळेत असताना अतिशय हुशार असलेल्या वैष्णवी हिच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच आंगणेवाडी व परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी वैष्णवी हिचे आजोबा जयप्रकाश सदाशिव आंगणे व बहीण यांच्याकडून पोलिसानी प्राथमिक माहिती घेतली आहे. मूळ आंगणेवाडी येथील वैष्णवी गुरव ही गेले दहा महिने वडाचापाट नवपाटवाडी येथील एका घरी वास्तव्यास होती. तीचे प्राथमिक शिक्षण मसुरे इंग्लिश मिडीयम स्कूल येथे झाले होते. दुपारी तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर येताच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे, पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी विवेक फरांदे, श्री. पेडणेकर यांनी घटनास्थळी जावून पंचानामा करून मृतदेह ताब्यात घेतला. सायंकाळी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
या घटनेची माहिती आंगणेवाडी येथील नातेवाईकांना मिळताच त्यांनी त्वरीत नवपाटवाडी येथे धाव घेतली. वैष्णवी हिच्या मागे आजोबा, आजी, बहीण तसेच अन्य परिवार आहे.
दरम्यान वैष्णवी हिच्या आत्महत्या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. वैष्णवी हिने तिच्या बहिणीला मेसेज पाठवले होते. वैष्णवी हिच्या बहिणीने याबाबतची माहिती पोलीसांना दिली आहे. त्यामुळे पोलिसांनी वैष्णवी हिचा मोबाईल तपासासाठी ताब्यात घेतला आहे. मोबाईल मेसेज यांची तपासणी तसेच नातेवाईकांची जबाब नोंदणी केली जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक विजय यादव यांनी सांगितले.