You are currently viewing मालवण तालुक्यातील युवतीची गळफास लावून आत्महत्या ?

मालवण तालुक्यातील युवतीची गळफास लावून आत्महत्या ?

मालवण :

 

मालवण तालुक्यातील वडाचापाट नवपाटवाडी येथे काही महिन्यांपासून वास्तव्यास असलेल्या वैष्णवी प्रशांत गुरव वय वर्षे १७ मूळ रा. आंगणेवाडी ता. मालवण हीचा मृतदेह राहत असलेल्या घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास लावलेल्या स्थितीत दिसून आला. आज बुधवारी दुपारी ही घटना निदर्शनास आली. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नव्हते. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करत मालवण पोलीस अधिक तपास करत आहेत. शाळेत असताना अतिशय हुशार असलेल्या वैष्णवी हिच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच आंगणेवाडी व परिसरातील ग्रामस्थांनीही धाव घेतली होती.

याप्रकरणी वैष्णवी हिचे आजोबा जयप्रकाश सदाशिव आंगणे व बहीण यांच्याकडून पोलिसानी प्राथमिक माहिती घेतली आहे. मूळ आंगणेवाडी येथील वैष्णवी गुरव ही गेले दहा महिने वडाचापाट नवपाटवाडी येथील एका घरी वास्तव्यास होती. तीचे प्राथमिक शिक्षण मसुरे इंग्लिश मिडीयम स्कूल येथे झाले होते. दुपारी तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर येताच खळबळ उडाली. याबाबत माहिती मिळाल्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे, मालवण पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पो. कॉ. विवके फरांदे, पेडणेकर यांनी घटनास्थळी जावून पंचानामा करून मृतदेह ताब्यात घेतला. सायंकाळी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

या घटनेची माहिती आंगणेवाडी येथील नातेवाईकांना मिळताच त्यांनी त्वरीत नवपाटवाडी येथे धाव घेतली. वैष्णवी हिच्या पश्चात आंगणेवाडी येथील घरी आजोबा, आजी, बहीण तसेच अन्य परिवार आहे.

दरम्यान, वैष्णवी हिच्या आत्महत्या प्रकरणी मालवण पोलीस अधिक तपास करत आहेत. वैष्णवी हिने तिच्या बहिणीला मॅसेज पाठवले होते. वैष्णवी हिच्या बहिणीने याबबतची माहिती मालवण पोलीसांना दिली आहे. त्यामुळे मालवण पोलिसांनी वैष्णवी हिचा मोबाईल तपासासाठी ताब्यात घेतला आहे. मोबाईल मेसेज यांची तपासणी तसेच नातेवाईकांची जबाब नोंदणी केली जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक विजय यादव यांनी माहिती देताना सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा