You are currently viewing सिंधुदुर्गात ओला दुष्काळ जाहीर करा

सिंधुदुर्गात ओला दुष्काळ जाहीर करा

हेक्टरी ७५ हजार रुपये मदत द्या; जिल्हा काँग्रेसचे राज्य शासनासाठी जिल्हा प्रशासनाला निवेदन

ओरोस

परतीच्या पावसाने जिल्ह्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करावेत. तसेच ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७५ हजार रुपये मदत द्यावी. त्याच बरोबर मजुरांना विशेष अनुदान द्यावे, अशा प्रकारची राज्य शासनाकडे मागणी करणारे निवेदन जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्यावतीने आज जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.
शेतकरी हा आपला अन्नदाता आहे. शेतकरी जगला तर देश जगेल. परंतू परतीच्या पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी प्रचंड हवालदिल झाला आहे. असे असताना शासनामार्फत साधे पंचनामेही होत नाहीत. खरेतर या नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची गरज आहे. मात्र राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या सुख दुःखाशी काही देणे घेणे नाही. परंतू काँग्रेस पक्ष हा सदैव शेतकऱ्यांच्या पाठिशी उभा राहिलेला आहे. त्यामुळे आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्र सरकारचे याकडे लक्ष वेधून सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजार रुपये मदत तातडीने द्यावी तसेच मजूरांसाठी विशेष अनुदान जाहीर करावे.
ही मदत शेतकऱ्यांना व मजूरांना तातडीने दिवाळीपूर्वी देण्यात यावी. तसेच मोदी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे जागतिक भूक निर्देशांकात भारताची मोठी घसरण झाली असून, जगात १२१ देशांपैकी १०७ व्या क्रमांकावर आपला देश आला आहे. हे अतिशय खेदजनक आहे. भारताची ही प्रतिमा सुधारण्यासाठी शेतकरी हिताचे व्यापक धोरण केंद्र सरकार कडून आखण्यात यावेत. आमच्या या मागण्या शासनाच्या प्रतिनिधी म्हणून आपण सरकार पर्यंत पोहचवून सदर मागण्यांचा पाठपुरावा करावा, अशी विनंती जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, नागेश मौर्य, प्रकाश जैतापकर, प्रविण वरुणकर, विजय जमखान आदी उपस्थित होते. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ जयकृष्ण फड यांच्याकडे हे निवेदन देण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा