You are currently viewing भारतात आर्थिक मंदी नाही; उद्योग मंत्री नारायण राणे

भारतात आर्थिक मंदी नाही; उद्योग मंत्री नारायण राणे

सावंतवाडी :

 

युरोपात आर्थिक मंदीचे सावट असले तरी भारतात ते नाही. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन या सक्षम आहेत. मोदींच्या मंत्रिमंडळात आमच्यासारखे मंत्री आहेत. त्यामुळे जागतिक मंदीचा भारतावर कोणताही परिणाम होणार नाही. कोरोना काळात जागतिक स्तरावर मोठा परिणाम झालेला असताना भारतीय अर्थव्यवस्था ढासळू दिली नाही. त्यामुळे काहीही झाले तरी कोणत्याही बाबतीत जनतेला झळ पोहचेल असे होऊ देणार नाही, असा विश्वास केंद्रीय सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला.

सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, भाजपचे जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब, तालुका मंडल अध्यक्ष महेश धुरी, शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, मोहिनी मडगावकर, संदीप कुडतरकर, जिल्हा बँक संचालक रवी मडगावकर, गुरुनाथ सावंत, जावेद खतीब, गुरु मठकर, केतन आजगांवकर आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कोकणात मी माझ्या लघु सूक्ष्म व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार आणणार आहे. माझ्या खात्यामार्फत महिलांसाठी क्लस्टर व बचत गटामार्फत रोजगार देण्यात येणार आहे. त्यासाठीचे सर्वेक्षण अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सध्या सुरू आहे. या उद्योगांमध्ये महिला एससी व एसटी वर्गासाठी तब्बल ३५ टक्के सबसिडी देण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक असलेली ट्रेनिंग सेंटर देखील लवकरच सुरू करण्यात येणार असून काही रोजगाराभिमुख उद्योगही लवकरच मार्गी लागणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

दोडामार्ग आडाळी एमआयडीसी संदर्भात माझी अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. मी त्या ठिकाणी भेट देणार असून तेथे आवश्यक असलेल्या सोयी सुविधा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. काही शिल्लक असलेली कामे मार्गी लागणार आहेत. त्यानंतर पावसाळ्यानंतर तेथील भूखंडांचे वाटप केले जाईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

शिवसेनेचे चिन्ह जाणं किंवा पक्षाचे नाव जाणे ही उद्धव ठाकरे यांची राजकीय आत्महत्या आहे. त्यांच्या वर्तनामुळेच तब्बल ४० आमदार त्यांना सोडून गेले. मात्र त्यांना रोखण्याची हिंमत ते दाखवू शकले नाहीत. त्यामुळे ओढवलेल्या परिस्थितीला ते स्वतःच जबाबदार आहेत. मी शिवसेनेतून बाहेर पडलो त्यावेळची परिस्थिती व कारणे ही वेगळी होती त्यामुळे आताच्या परिस्थितीबाबत काही वाटणे याला काही अर्थ नाही असे त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले.

आम्ही भावनिक राजकारण करीत नाही. अंधेरी पूर्व मतदार संघात भाजपने आपला उमेदवार दिला आहे. माजी आमदार रमेश लटके यांच्या पत्नी तेथे निवडणूक लढवीत आहेत. त्याबाबत आपल्याला काही बोलायचे नाही. मात्र, भाजपने त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली असल्याने त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार असून ही जागा भाजप नक्कीच जिंकेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

नारायण राणेंवर टीका केलेली कोकणी जनता कधीही सहन करणार नाही. कारण गेल्या पस्तीस वर्षात कोकणात विकास प्रगती काय असते हे आपण दाखवून दिले. आत्ताच मी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोललो. कोकणातील सर्व धरणे तुडुंब भरली असून येथे भविष्यात पाण्याचा प्रश्न उद्भवणार नाही. ही धरणे रस्ते तसेच जिल्ह्यातील विकास कामे ही मीच मार्गी लावली आहेत. माझ्यावर टीका करणाऱ्यांचं कोकणच्या विकासात काय योगदान आहे. टीका करणारे समोर येऊन उभे राहण्याची हिंमत तरी दाखवतील का, असा सवाल उपस्थित करतानाच दसरा मेळाव्यात माझ्यावर टीका करण्यासाठी ज्यांना वक्ते केले होते त्यावरून ठाकरे शिवसेनेचा घसरलेला दर्जाच दिसून आला, अशा शब्दात त्यांनी टीकाकारांचा समाचार घेतला.

आमदार शहाजी बापू हे आमचे जुने सहकारी आहेत. मी महसूल मंत्री असताना ते माझ्या समवेत आमदार होते. लोकसभा निवडणुकी संदर्भात त्यांनी काही भाषा केले असेल तर ते त्यांचे वैयक्तिक मत आहे. तसेही आगामी लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदाराला पराभूत करण्यासाठी आता वेळ लागणार नाही. या मतदारसंघातील जनता त्याला घरी बसवेल, असेही त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले.

राज्यात युतीचे सरकार असले तरीही स्थानिक पातळीवर होणाऱ्या आगामी निवडणुकांबाबत त्यावेळची परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल. सोयीच्या ठिकाणीच युती केली जाईल. याबाबत कार्यकर्त्यांची व जनतेची मते जाणूनच निर्णय घेऊ, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

*भातशेतीची नुकसान भरपाई मिळवून देणार : नारायण राणे*

कोकणातील भात शेती कापणीला आलेली असताना परतीच्या पावसामुळे त्याचे मोठे नुकसान झालेले आहे. आता राज्यात आमची सत्ता आहे त्यामुळे याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधून येथील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा