कुडाळ :
दिवाळीच्या निमित्ताने कुडाळ मध्ये नर्मदाआई महिला औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित कुडाळ, सिंधुदुर्ग यांच्यावतीने ‘मी आत्मनिर्भर’ या विशेष प्रदर्शन आणि खरेदी महोत्सवाच आयोजन करण्यात आले आहे. दि. १६ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर या कालावधीत रोज दुपारी ३ ते रात्री ९ या वेळेत महालक्ष्मी मंगल कार्यालयामध्ये हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती नर्मदाआई महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या अध्यक्ष संध्या तेरसे यांनी आज पत्रकार परिषेद दिली. दिव्यांग बांधवांचे विविध वस्तूंचे स्टॉल्स हे या प्रदर्शनचे खास वैशिट्य आहे.
संध्या तेरसे यांनी “मी आत्मनिर्भर” या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष असून या उपक्रमाबद्दल अधिक माहिती दिली. दिपावली म्हणजे आनंदाचा क्षण. या क्षणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ‘मी आत्मनिर्भर’ या उपक्रमाअंतर्गत लघु उद्योजकांना प्रोत्साहन आणि बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा आमचा एकमेव उद्देश आहे. वैशिष्ट्य म्हणजे प्रदर्शनात दिव्यांग लघु उद्योजकांसाठी विशेष प्रयोजन असून सदर समूहांनी तयार केलेल्या वस्तूंचा समावेश करण्यात आलेला आहे.
रविवार दि. १६ ऑक्टोबर रोजी कुडाळच्या महालक्ष्मी सभागृहात सकाळी ११ वाजता या प्रदर्शनाची गणेश पूजन करून अनौपचारिक सुरुवात होणार आहे. दुपारी ३ वाजता निलमताई राणे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. या प्रदर्शनसासाठी विविध प्रकारचे ४६ स्टॉल्स मांडण्यात येणार आहेत. दिवाळीसाठी लागणाऱ्या विविध वस्तू तसेच इतर अनेक उत्पादने असणार आहेत. या प्रदर्शनामध्ये शासनाच्या विविध योजनांची माहिती उत्पादक आणि ग्राहकांना करून दिली जाणार आहे.
जिल्हा बँकेने सुद्धा या प्रदर्शनाला आपले पाठबळ जाहीर केले आहे. या प्रदर्शनातून महिला उद्योजकांना, व्यावसायिकांना एक व्यासपीठ आणि सहकार्य मिळणार असल्याचं संध्या तेरसे यांनी सांगितले. एकत्रित व्यवसाय करताना एकमेकांना सहकार्य करणे हा देखील या प्रदर्शनाचा उद्देश आहे. या प्रदर्शनामध्ये दिवाळी साठी लागणाऱ्या सर्व वस्तू, खाद्यपदार्थ,आकाश कंदील, पणत्या, क्वायरच्या वस्तू, अशा अनेक वस्तू येथे पाहायला आणि खरेदी करण्यासाठी उपलब्ध असणार आहेत.
मी आत्मनिर्भर या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष असून सिंधुदुर्गातील लघु उद्योजकांना हक्काचं व्यासपीठ मिळेल आणि चालना मिळेल असा आम्हांस विश्वास आहे. आपल्या भेटीने आमच्या उद्योजकांचा आनंद वृद्धिंगत करावा असे आवाहन यावेळी संध्या तेरसे यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेला अनुजा सावंत, दीप्ती मोरे, प्रज्ञा राणे, मुक्ती परब, रेखा काणेकर उपस्थित होत्या.