उद्योजक मार्गदर्शन कार्यशाळेला अनुपस्थित राहिल्याने बँक अधिकाऱ्यांना धरले धारेवर
सिंधुदुर्ग जिल्हा उद्योग केंद्रामार्फत निर्यातदार उद्योजक व नवं उद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजनच्या जुन्या सभागृहात बुधवारी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.मात्र या कार्यशाळेला जिल्हा अग्रणी बँकांचे अधिकारी उपस्थित न राहिल्याने आ. वैभव नाईक यांनी उद्योग केंद्राच्या अधिकाऱ्यांना याचा जाब विचारत बँक अधिकारी आल्याशिवाय कार्यशाळा घेऊ नका असे ठणकावले. जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनीही संतप्त होत तीच भूमिका घेतली व त्या कार्यशाळेतून बाहेर पडल्या. आमदार वैभव नाईक यांच्या आक्रमक भूमिकेनंतर उद्योग केंद्राच्या अधिकाऱ्यांनी बँकिंग अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. अडीच तास उशिराने आलेल्या अग्रणी बँकेच्या अधिकाऱ्यांनाही आ. वैभव नाईक यांनी चांगलेच फैलावर घेतले.
यावेळी जि. प. चे माजी गटनेते नागेंद्र परब,शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, कृष्णा धुरी आदी उपस्थित होते.या सर्वांनी जिल्हा अग्रणी बँकेच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत धारेवर धरले. जिल्हा उद्योग केंद्राकडे उद्योग व्यवसायासाठी दोन हजार प्रस्ताव आलेत. त्यातील पात्र ११०० प्रस्ताव बँकांकडे मंजुरीसाठी पाठवले. प्रत्यक्षात त्यातील ३०० प्रस्तावच मंजूर केले गेले. याबाबतही आमदारांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. वर्ष वर्ष प्रस्ताव रखडवून ठेवले जातात. मग उद्योजक तयार होणार कसे? असा सवालही उपस्थित केला. प्रस्ताव रखडवून तरुण उद्योजकांची हेळसांड केली जात आहे. विविध कारणे देऊन उद्योजकांचे प्रस्ताव रखडवले जात आहेत. बँकांकडून त्यांना योग्य मार्गदर्शन केले जात नाही. अशा अनेक तक्रारी आमच्याकडे येत आहेत. याबाबत आ.वैभव नाईक यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले.
त्यानंतर सर्व प्रस्ताव मंजूर करण्यात येतील, असे आश्वासन अग्रणी बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिले. तसेच दरमहा बैठक घेऊन वेळच्या वेळी प्रस्ताव मंजूर केले जातील, असे सांगण्यात आले. नंतर दहा वाजताची कार्यशाळा साडेबारा वाजल्यानंतर सुरू झाली. बँकिंग अधिकाऱ्यांच्या अनास्थेबाबत उपस्थित उद्योजकांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली.