*जागतीकसाहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सौ सीमा शास्त्री मोडक लिखीत अप्रतिम लेख*
*थोडसं मनातलं*
खूप दिवसांपासून या मुद्द्यावर लिहावं असं वाटत होतं. पण असं वाटलं की आपले हे विचार कोणाला आवडतील का?कोणाची मनं तर दुखावली जाणार नाही ना? पण मग मनात विचार केला की माझा हा विचार, कोणाचं मन दुखावण्यासाठी नक्कीच नाही; तर उलट मन जपण्यासाठी आहे.
आपण सगळेच एकमेकांच्या सुखदुःखात मनापासून सामील होतो. दुसऱ्याच्या आनंदात आनंद आणि दुसऱ्याच्या दुःखात दुःख मानणं ही तर आपली संस्कृती आहे. आपले संस्कार आहेत. पूर्वी एखाद्या कुटुंबाकडे द्वार दर्शनाला जाणं जेवढं महत्त्वाचं मानलं जायचं, तेवढेच आताही मानलं जातं. फरक फक्त एवढाच आहे की आता पूर्वीसारखा वेळ कोणाकडे नाही. इच्छा असूनही काही वेळा आपल्याला त्या परिवाराचं सांत्वन करायला जायला जमत नाही. खरंतर त्या परिवाराला आपल्या सांत्वनाची, भावनिक आधाराची खूप गरज असते. आणि आपणही तो आधार शब्दांनी देतोच. काही वेळेला प्रत्यक्ष भेटून तर काही वेळेला फोनच्या माध्यमातून.
पण मला वाटतं त्या कुटुंबाला त्यावेळी फक्त भावनिक आधार नव्हे तर तुमच्या वेळेची, तुमच्या आधाराची गरज असते. मग वेळेची गरज म्हणजे त्यांच्या घरी जाऊन फक्त बसायचं नाही. तर आपल्या वेळेचा त्यांना उपयोग झाला पाहिजे. कसा? बघा हं त्यांना बाजारातून रोजची भाजी आणून देणं, किराणामाल आणून देणं, अगदी महत्त्वाचं म्हणजे गिरणीतून पीठ दळून आणणं, हे सुद्धा गरजेचं असतं. अर्थात यासाठी त्यांचे पैसे आपण घेतोच. फक्त त्या कुटुंबाच्या घरी जाऊन बसणं जितकं महत्त्वाचं आहे त्या पेक्षा मला वाटतं त्यांना आपली ही मदतही हवी आहे.
वेळेप्रमाणेच त्या कुटुंबाला गरज असेल आणि आपल्याला शक्य असेल तर आर्थिक मदतही करायला हरकत नाही. केवळ त्यांच्या नातेवाईकांनीच नाही तर मित्रपरिवाराने सुद्धा अशा प्रसंगी खारीचा का होईना वाटा उचलायला हरकत नाही. हे झालं आपल्याकडून त्यांना करायचं सहकार्य.
आता सगळ्यात महत्त्वाचं पाहूया. आजही बऱ्याच ठिकाणी द्वार दर्शनाला गेल्यावर त्या बारा तेरा दिवसात त्या दुःखाचा डोंगर कोसळलेल्या कुटुंबातील महिला आलेल्या प्रत्येकाला चहा, कॉफी, दूध देतात. मला वाटतं आपण सगळ्यांनी याचा नक्कीच विचार करायला हवा. अहो आधीच दुःखाचं घर, पै पाहुणे आलेले, आणि त्यात गावातील किंवा जवळच्या गावाहून आलेल्या लोकांसाठी चहा, कॉफी, पाणी देणं म्हणजे त्या घरातली महिला पूर्ण दिवस मानसिक आणि शारीरिक थकत नसतील का? बरं पाणी ही बाब खूप साधी वाटते. पण विचार करा एवढे तेरा दिवस येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला पाणी देण्यासाठी त्या घरात पाणी साठवण्याची सोय असेल का? चहा, कॉफीसाठी येणारा खर्च, म्हणजे दूध, साखर, चहा, कॉफी आणणं त्यांना शक्य आहे का? आणि या दिवसात खर्च अधिक होतोच. त्यात हा खर्च आणि श्रम याचाही आपण विचार करावा असं मला वाटतं. बरं हा सगळा ताण जो येतो तो घरातील महिलांवरच. घरात महिला नसतील तर मग ज्या पाहुण्या म्हणून आलेल्या आहेत त्या महिलांना बिचार्यांना दिवसभर उभंच राहावं लागतं.
चहा कॉफी देणं प्रत्येकालाच शक्य नसतं, परवडणारही नसतं. पण काही वेळेला केवळ रीत भात म्हणून कर्ज काढून हा चहा पाण्याचा खर्च केला जातो. मग आपण सगळ्यांनी जर याबाबतीत ठरवलं की द्वारदर्शनाला गेल्यावर आपण काहीही घ्यायचे नाही. आणि शक्य असेल तर आपणच त्यांना काही घेऊन गेलो तर?त्या घरात वृद्ध, लहान मुलं,आजारी व्यक्ती असतात. त्यांना भूक लागते. अशावेळी साधा चिवडा, बिस्कीटही त्यांच्या पोटाला आधार देतात. मग आपणच त्या कुटुंबासाठी असं काही घेऊन गेलो तर? बघा, दवाखान्यात किंवा घरी जेव्हा आपण एखाद्या पेशंटला बघायला जातो तेव्हा जसे काही फळ,बिस्कीट घेऊन जातो तसंच मला वाटतं यावेळी सुद्धा आपण अशीच मदत या कुटुंबाला केली तर काय हरकत आहे.
मग फक्त चिवडा, बिस्कीटच नाही एखादी भाजी, कांदे, बटाटे, अगदी कोथिंबीरीची जुडी सुद्धा चालेल. यामुळे त्या कुटुंबातील सदस्यांना बाहेर जाण्याची गरज राहणार नाही. तसेच सगळे कुटुंबीय घरात राहिल्याने नात्यातील प्रेमही टिकून राहील. गेलेल्या व्यक्तीच्या आठवणी, कार्यही सगळ्यांना समजेल. प्रत्येकाला मानसिक, भावनिक आधार मिळेल. शारीरिक श्रम देखील थोडेफार कमी होतील.
अशा प्रकारे आपण सर्व वागलो तर मला वाटतं त्या दुःखी कुटुंबाला थोडासा का होईना आधार मिळेल. काळ बदलला, काळाप्रमाणे आपणही बदललो तर सगळ्यांना सोयीचं जाईल. असंच थोडंसं उत्तर कार्याच्या जेवणाबाबतीत लिहावसं वाटतं. आपल्याला जेवायला जायला जमणार आहे की नाही हे आधीच आपण त्यांना कळवल्यास अन्न वाया जाणार नाही. याचाही आपण नक्की विचार करावा.
हे माझे विचार मी अगदी मनमोकळेपणाने आपल्या सर्वांसमोर मांडले. ज्यांना शक्य आहे त्यांनी याचा नक्कीच विचार करा. शक्य झाल्यास तो विचार कृतीत पण आणूया. खरंतर पुन्हा एकदा सांगावसं वाटतंय की माझ्या या मतात मला कोणाच्याही भावना दुखावण्याचा अजिबात उद्देश नाही. बघा तर मग जमेल का आपल्याला हे?
काळाप्रमाणे आपणही थोडंसे बदलायचं का?
*सौ.सीमा श्रीराम शास्त्री मोडक*
नंदुरबार